www.24taas.com, मुंबई
मुंबईतील भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचं नुतनीकरण करण्यात येणार आहे. राणीच्या बागेच्या नुतनीकरणाला केंद्र सरकारच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राणीची बाग पुन्हा प्राणी पक्ष्यांनी भरणार आहे.
नव्या आराखड्यानुसार या वर्षी वाघ, सिंह यांच्यासोबतच २३ प्राण्यांचं आगमन होणार आहे. यांतील १८ प्राणी भारतीय तर ५ प्राणी परदेशी असतील. कोल्हा, लांडगा, अस्वल, बिबट्या, चितळ, रानडडुक्कर, तरस यांसारख्या जंगली प्राण्यासोबत विविध जातींचे सापही येणार आहेत. कासव आणि वेगवेगळ्या समुद्री माशांचाही राणीच्या बागेत विहार होणार आहे. विशेष म्हणजे हाम्बोल्ट पेंग्विनही राणीच्या बागेत दाखल होणार आहे. या नव्या पाहुण्यांसाठी २४ पिंजरे तयार करण्यात येणार आहेत.
मात्र हे ‘परप्रांतिय’ प्राणी राणीच्या बागेत येत असताना येथील स्थानिक रहिवासी असलेल्या प्राण्यांना येथून हलवण्यात येत आहे. यामध्ये दोन हत्तीणी, हिमालयीन अस्वल, बोनेट माकडं आणि एक गेंडा या प्राण्यांना देशभरातील इतर प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात येईल. नव्या आराखड्यानुसार वृक्षांचं संवर्धन आणि संरक्षण केलं जाईल.