मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीची मागणी फेटाळ्यानंतर राष्ट्रवादीने सावध भूमिका घेत शनिवारी आमचा निर्णय घेऊ, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
बुधवारी रात्री झालेल्या समन्वय समिती बैठकीनंतर आता शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. जागावाटपाबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा होईल आणि पुढली भूमिका ठरवली जाईल, असे सुनील तटकरे यांनी म्हटलंय. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावल्याने पेच आहे. मात्र, राष्ट्रवादी १४४ जागांवर ठाम आहे. तर राष्ट्रवादीला एकही जागा वाढवून मिळणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मांडली आहे. पुण्यातल्या मेळाव्य़ानंतर माणिकरावांनी मुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतली. आपली भूमिका स्पष्ट केले.
यात सन्मानपूर्वक जागा वाटप व्हायला हवं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जागा वाटपाचा तिढा कायम असला तरी सात ऑगस्टला उमेदवारांची पहिली यादी तर १० ऑगस्टला दुसरी यादी जाहीर करणार असल्याची घोषणा यावेळी माणिकराव ठाकरेंनी केली. कालच्या समन्वय समितीच्या बैठकीतलीच भूमिका आज काँग्रेसनं कायम ठेवल्यामुळं आघाडी तुटणार की काय अशी चिन्ह दिसू लागली आहेत.
पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिका-यांच्या मेळाव्यात स्वबळाचा सूर उमटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं भ्रष्टाचार केला त्याचा फटका मात्र काँग्रेसला भोगावा लागत असल्याचं पदाधिका-यांनी या मेळाव्यात म्हटलंय. आघाडीबाबत 1 ते 5 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या असं आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. तर एनसीपीची ताकद वाढल्याचा दावा करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माणिकराव ठाकरे यांनी टोला मारला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.