मुंबई : राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी काँग्रेसनं धुडकावली आहे. राष्ट्रवादीचा प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे, असे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान १४४ जागांवर राष्ट्रवादी ठाम आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कायम दिसत आहे.
राष्ट्रवादीची निम्मे जागांची मागणी काँग्रेसनं धुडकवून लावलीय. राष्ट्रवादीला एकही जागा वाढवून मिळणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मांडलीय. पुण्यातल्या मेळाव्य़ानंतर माणिकरावांनी मुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतली.
यात सन्मानपूर्वक जागा वाटप व्हायला हवं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जागा वाटपाचा तिढा कायम असला तरी सात ऑगस्टला उमेदवारांची पहिली यादी तर १० ऑगस्टला दुसरी यादी जाहीर करणार असल्याची घोषणा यावेळी माणिकराव ठाकरेंनी केली. कालच्या समन्वय समितीच्या बैठकीतलीच भूमिका आज काँग्रेसनं कायम ठेवल्यामुळं आघाडी तुटणार की काय अशी चिन्ह दिसू लागली आहेत.
पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिका-यांच्या मेळाव्यात स्वबळाचा सूर उमटला. राष्ट्रवादी काँग्रेसनं भ्रष्टाचार केला त्याचा फटका मात्र काँग्रेसला भोगावा लागत असल्याचं पदाधिका-यांनी या मेळाव्यात म्हटलंय.
आघाडीबाबत 1 ते 5 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या, असं आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी केलं. तर एनसीपीची ताकद वाढल्याचा दावा करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माणिकराव ठाकरे यांनी टोला मारला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.