मुंबई : मुंबईतल्या गोरेगावमधल्या आरे कॉलनीत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते नैसगिक तलावाचं भूमिपूजन करण्यात आलं.
आरे कॉलनीतल्या परजापूर इथे हा नैसर्गिक तलाव आहे. विशेष म्हणजे 30 ऑक्टोबर 1955 ते 25 जानेवारी 1956 या काळात, हा तलाव सामाजिक श्रमदानातून बांधण्यात आला होता. त्या काळात 5 हजार 300 शिक्षक आणि लष्करी जवान यांनी हा तलाव बांधला होता.
सोबतच या तलावाच्या शेजारीच जवानांनी श्रमदानातून साडे तीन हजार मीटर लांब आणि 12 फूट रुंद रस्ताही तयार करुन दिला होता. दरम्यान त्यानंतरच्या 61 वर्षांमध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे या नैसर्गिक तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. मात्र आता पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, या नैसर्गिक तलावाचं सुशोभिकरण करणार आहे.