दाभोलकर - पानसरे यांची हत्या एकाच व्यक्तीकडून, सीबीआयच्या हाती ठोस पुरावे

दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या हाती आता पानसरेंच्या हत्येचे धागेदोरेही लागलेत. 

Updated: Jun 22, 2016, 03:08 PM IST
दाभोलकर - पानसरे यांची हत्या एकाच व्यक्तीकडून, सीबीआयच्या हाती ठोस पुरावे title=

मुंबई : दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या हाती आता पानसरेंच्या हत्येचे धागेदोरेही लागलेत. दोन्ही नेत्यांच्या रेकीसाठी एकच बाईक वापरली गेली असल्याचे तसेच हत्येसाठी एकच पिस्तुल वापरल्याचे पुरावे आढळलेत. यासोबतच आणखी एका हिंदुत्ववादी संघटनेचं नावही आता चर्चेत आले आहे.

लॅपटॉपमध्ये 'राक्षस' कोडवर्ड

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या एकाच व्यक्तीनं केली असण्याची शक्यता आता बळावली आहे. तसे ठोस पुरावेच सीबीआयच्या हाती लागले आहेत. २ जून रोजी तावडेच्या घरातून जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये 'राक्षस' कोडवर्डखालील काही व्यक्तींची यादी सीबीआयला आढळलीये. या यादीत डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचं नाव आढळले आहे. 

 नरेंद्र दाभोलकरांची रेकी

२२ जानेवारी २०१३ रोजी तावडे त्याची स्प्लेंडर बाईक घेऊन पनवेलहून पुण्याला अकोलकरकडे गेल्याचा पक्का पुरावा सीबीआयला मिळालाय. याच बाईकवरुन अकोलकर आणि सनातनच्या काही साधकांनी काही महिनं दाभोलकरांची रेकी केल्याचं स्पष्ट झाले आहे. 

पानसरेंची रेकीदेखील हीच बाईक वापरून केल्याचा संशय आहे. पानसरेंच्या हत्येनंतर मात्र ही बाईक अचानक गायब झाली. दाभोलकर-पानसरे हत्येसाठी एकच पिस्तूल वापरल्याचा बॅलॅस्टिक अहवाल आल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिलीये. 

सहा जणांना ट्रेनिंग

रुद्र पाटील, जयप्रकाश अण्णा, प्रविण निमकर, विनय पवार, अकोलकर, तावडे सहा जणांनी मिळून 'शूट-टू-किल'चं ट्रेनिंग घेतल्याचं स्पष्ट झाले आहे. त्यांची ११९ बँकखाती असल्याचंही समोर आलंय. या सहा जणांनी संपर्कात राहण्यासाठी तब्बल १६९ मोबाईल नंबर वापरले.   

वीरेंद्र तावडेच्या हालचालींवर लक्ष

२३ जून रोजी मुंबई उच्च न्यायलायात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान सीबीआय ही माहिती मुंबई उच्च न्यायालयात देणार आहे. साक्षीदार संजय साढवीलकर यानं दिलेल्या साक्षीनंतर वीरेंद्र तावडेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सीबीआयने सुरुवात केली. 

गोवा स्फोटाचे कनेक्शन

२००९ साली गोव्यात झालेल्या स्फोटांत मृत्यू होण्यापूर्वी मलगोंडा पाटील यानं तावडेला फोन केल्याचं तपासात समोर आलंय. एटीएस आणि एनआयए तपासाची सुई अकोलकरवर आधीच केंद्रित झाल्यामुळे सीबीआयचा तावडेवर संशय बळावला आणि त्याला अटक करण्यात आली. 

सोसायटीमधील रहिवाश्यांचा जबाब

तावडेला अटक होईपर्यंत अकोलकर त्याच्या पुण्यातल्या घरात बिनबोभाट राहात असल्याचंही स्पष्ट झालंय. मार्च २०१६पर्यंत अकोलकर त्याच्या पुण्यातल्या घरातच राहात होता. कारण मार्च महिन्यात सीबीआयनं त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात चालू महिन्याचं वीज बील सीबीआयच्या हाती लागलंय. सोसायटीत राहणाऱ्यांनीही अकोलकर मार्चपर्यंत घरातच राहात असल्याचा जबाब दिला आहे. 

सीबीआयच्या रडारवर आणखी कोण?

एकीकडे सनातन संस्थेचे साधक या प्रकरणात अडकत असताना सतानतची सहयोगी संस्था असलेली हिंदू जनजागृती समितीही सीबीआयच्या रडारवर आली आहे.