मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वॉर्ड फेररचना पुढच्या आठ दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने आज मुख्यायलात आयोजित पत्रकार परिषदेत ही शक्यता व्यक्त करण्यात आली.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक ५ मार्च २०१७ पूर्वी होणे अपेक्षित आहे. त्यात मतदारांचे प्रमाण आणि सहभाग वाढवण्याबाबत प्रशासनाने हाती घेतलेल्या जनजागृती विषयी माहिती देण्यात आली.
त्यानुसार भारत निवडणूक आयोगातर्फे सप्टेंबर-ऑक्टोबर २०१६ मधे मतदार नोंदणीसाठी पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यावेळी मात्र दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या व्यक्ती मतदार नोंदणी करण्यासाठी पात्र राहातील.
विधानसभा यादीमधे आपलं नाव असेल तरच मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीत मतदान करता येणार आहे. मतदार नोंदणी आणि सहभाग वाढावा यासाठी महापालिकेनं काही मराठी सिने-नाट्यसृष्टीतील कलावंतांच्या माध्यमातून आवाहन मोहिम हाती घेतलीय. तसंच कल्पक सूचनात्मक लेख, घोषवाक्य, चित्रकला आणि मायक्रो फिल्मच्या स्पर्धांचंही आयोजन केले आहे.