पवारांपाठोपाठ मुंडेंचा गौप्यस्फोट; आघाडीला धक्का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केली.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 10, 2014, 11:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडमध्ये बोलताना केली.
मात्र, `मीच त्यांना एनडीएसोबत घेण्यास विरोध केला, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. `मोदींना भेटण्यात गैर काय, असं आता पवार सांगतायत... मग, गेली १० वर्षं होतात कुठे?` असा सवालही मुंडेंनी यानिमित्तानं पवारांना केलाय.
शिवसेनेनंही केलं पवार-मोदी भेटीचं समर्थन
दरम्यान, नरेंद्र मोदी आणि शरद पवार भेटीचं शिवसेनेकडून समर्थन करण्यात आलंय. याबद्दल बोलताना `एका राज्याचा मुख्यमंत्री आणि एक कृषीमंत्री भेटले तर गैर काय? या भेटीकडे टीकात्मकदृष्टीने पाहू नये` असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.

पवारांनी दिली मोदींना भेटल्याची कबुली
गेल्या आठवड्यात पवारांनी मोदींची भेट घेतल्याच्या वृत्तानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडून पवार-मोदी भेटीचा सपशेल इन्कार करण्यात आला होता. परंतु, आता मात्र पवारांनीच उघडपणे आपल्या मोदी भेटीचं समर्थन केलंय. `नरेंद्र मोदी आणि माझ्या भेटीची चर्चा होते. पण मी काही कुणा पाकिस्तानी वा चिनी व्यक्तीला भेटलेलो नाही` असं पवार म्हणाले. `लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचा आहे याचा मी विचार करत नाही. एक केंद्रीय मंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडत असतो` अशी पुस्तीही पवारांनी जोडली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.