मुंबई : दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबईला टार्गेट करण्याचे ठरविले आहे. तसे संकेत गुप्तचर विभागाने दिलेत. त्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे.
मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे. मुंबईवर कधी हल्ला होईल, हा हल्ला कोण करणार आहे. तसेच दहशतवादी यांची नावे आणि संघटना यांचा तपशीलही आयबीने दिला आहे. २८ जानेवारी आधी मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर हे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे. सिद्धीविनायक मंदिरात मंगळवारी गर्दी असते, तो मुहूर्त साधूनच हा हल्ला करण्याचा अतिरेक्यांचा डाव आहे, अशी माहीत गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेली आहे. यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जमात उद दावा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, एलईटी या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी मुंबईत दाखल झालेत. जेहादींचा म्होरक्या अब्दुल्ला अल कुरेशीही मुंबईत असल्याचं समजतंय. तसंच, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबिद झेमन, शमशेर यांची टोळीही भारतात घुसल्याचं समजतंय. मुंबई, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशात हे दहशतवादी घुसल्याची माहिती मिळतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.