मुंबई : मुंबईतील टॅक्सी चालकांनी आपल्याला जेवणासाठी दुपारी १ ते २ दरम्यान टॅक्सी बंद ठेवण्याची सूट असावी, घरी परततांना आपल्या घराकडे जाणारी भाडी असावीत, थोडक्यात टॅक्सी चालकांना भाडी नाकारण्य़ाचा अधिकार असावा.
मुंबईचे टॅक्सी चालक दुपारी जेवणासाठी एक तासाची सूट मागतायत. यावरून ते पुण्यातून चुकून मुंबईत आले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. वामकुक्षी घेण्याइतका कमी वेग मुंबई शहराचा निश्चितच नाही. पुण्यातही तासाभराची सुटी रिक्षावाल्यांना नसते.
अशी असते मनमानी
तुम्हाला सकाळी-सकाळी मुलांना टॅक्सीने सोडायचं असेल, किंवा सकाळी सात वाजेचं ऑफिस गाठायचं असेल, तर "साहब गाडी जमा करना है, गाडी में तेल भरने जाना है", अशी उत्तर मिळतात.
कारण रात्रपाळी संपवून सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान टॅक्सीवाले आपली टॅक्सी इंधन भरून दिवसपाळीच्या ड्रायव्हरकडे सोपवतात. मात्र हीच वेळ ऑफिस, शाळा, कॉलेज गाठण्याची असते.
घराकडील भाडं हवं
हा त्रास मुंबईकर सहन करत असतांना एक नवा त्रास सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. कारण टॅक्सी वाल्यांनी म्हणे, आपल्या मेळाव्यात घरी जातांना सायंकाळी ५ ते ८ दरम्यान घराजवळची भाडी फक्त स्वीकारण्याची मूभा असावी, अशी मागणी केली आहे, म्हणजे ही सार्वजनिक सेवा असली तर ग्राहकांना सेवा देण्यापेक्षा, पैसे घेऊन वेळेवर घरी परतण्याची सेवा ग्राहकांनी यांना द्यावी अशी टॅक्सी चालकांची अपेक्षा आहे.
जेवण आणि वामकुक्षी
तसेच दुपारी १ ते २ दरम्यान जेवणाची वेळ असते, त्या दरम्यान टॅक्सी बंद असावी, अशी टॅक्सी चालकांची मागणी आहे. मुंबईच्या टॅक्सीवाल्यांची जेवणाची वेळ मागेपुढे होत असेल, पण सामान्य मुंबईकरांना विचारलं तर ते नक्की सांगतील की यावेळत टॅक्सी चालकांची उत्तरं काय असतात, "साहब खाना खाने जाना है",
अशा वेळी जेवायला कुणीही मुंबईकर त्यांना अडवत नाही, काही टॅक्सीवाले टॅक्सीत बसूनच डबा खातांना दिसतात, मात्र एखाद्या टॅक्सी वाल्याला मुंबई सेन्ट्रलला जाऊन, आपल्या आवडत्या आणि सोयीस्कर हॉटेलमध्ये जेवायचं असेल, तर मुंबई सेन्ट्रलकडे जाणारे ग्राहकचं टॅक्सी चालकांना हवे असतात.
यावरून टॅक्सी चालकांच्या मेळाव्यातील टॅक्सी चालकांची ही मागणी टॅक्सीला सार्वजनिक सेवेतून बाहेर नेणारी आणि लाडवणारी असल्याची प्रतिक्रिया मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.