मुंबई: सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दुर्मिळ अशी यशस्वी शस्त्रक्रिया करून एका बालकाला पुनर्जन्म दिलाय. छातीचं हाड नसलेल्या तीन महिन्यांच्या बाळावर डॉ. पारस कोठारींच्या टीमनं शस्त्रक्रिया केली.
मुंबईतल्या सायनमध्ये राहणाऱ्या श्रृती बोरले यांच्यापोटी जन्म घेतलेला हा चिमुकला जन्मत:च एक मोठा आजार सोबत घेवून आला होता. त्याच्या छातीमध्ये दोन्ही सांगाड्यांना जोडणारं मधलं हाडच नव्हतं. म्हणजे आपल्या ह्रदयाच्या बाहेरील बाजूस संरक्षणासाठी जे हाड असतं तेच नव्हतं. केवळ त्वचा होती. त्यामुळं धडधडणारं ह्रदय स्पष्टपणे असं दिसत असे.
परिणामी छातीमध्ये इन्फेक्शन होवून सर्दी, खोकल्याचा त्रास वाढला. बोरले कुटुंबियांनी काही खाजगी हॉस्पिटल्समध्ये हा आजार दाखवला. परंतु या खाजगी हॉस्पिटल्सनी या आजारावर उपचार करण्यास असमर्थता दाखवली. अखेर बीएमसीच्या सायन हॉस्पिटलमधील पेडियाट्रीक सर्जन डॉ. पारस कोठारी आणि त्यांच्या टीमनं हे आव्हान स्वीकारलं आणि अवघ्या तीन महिन्याच्या या चिमुकल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेनंतर आता या चिमुकल्याची तब्येत चांगली तर आहेच शिवाय भविष्यात कुठलाही त्रास त्याला होणार नसून तो नॉर्मल आयुष्य जगेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केलाय. शस्त्रक्रियेनंतर बोरले कुटुंबियांनीही आता सुटकेचा निश्वास टाकलाय.
जगभरात आतापर्यंत अशा प्रकारच्या केवळ २४ केसेस आढळल्या आहेत. अत्यंत दुर्मिळ अशी शस्त्रक्रिया करून डॉ. कोठारींच्या टीमनं एका चिमुकल्याला जीवदान दिल्यानं सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.