मुंबईतील रेल्वे प्रश्न, कराड - चिपळूण मार्गाबाबत CM चे रेल्वे मंत्र्यांना पत्र

नवीन वर्षात रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत आहे. कारण कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्याने अनेक अपेक्षा आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्ये येत असलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला मोठा वाटा मिळावा, यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केलेत. याबाबत एक लांबलचक पत्रच लिहीलंय.

Updated: Dec 31, 2014, 12:02 PM IST
मुंबईतील रेल्वे प्रश्न, कराड - चिपळूण मार्गाबाबत CM चे रेल्वे मंत्र्यांना पत्र title=

मुंबई : नवीन वर्षात रेल्वेचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत आहे. कारण कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्याने अनेक अपेक्षा आहेत. फेब्रुवारी २०१५ मध्ये येत असलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात राज्याच्या वाट्याला मोठा वाटा मिळावा, यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केलेत. याबाबत एक लांबलचक पत्रच लिहीलंय.

रेल्वे संदर्भातील राज्यातील विविध प्रकल्पांना मान्यता देण्याची मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच मुंबईसाठी विशेष मागणी करण्यात आली आहे.

मुंबईतील सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर MUTP दोन प्रकल्पाला निधी उपलब्ध झाल्यास रखडलेले - अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होतील. मुंबई महानगर भागातील भविष्यातील वाढतं नागरिकरण लक्षात घेता MUTP तीन प्रकल्पाला मान्यता देण्याची मागणी मुख्यमंत्री यांनी पत्राद्वारे केली आहे.

मुंबईत वानुकूलित लोकल सुरु करण्याची मागणीचा आग्रह करण्यात आलाय. याचबरोबर राज्यात अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या सुरु करण्याची मागणी करण्यात मुख्यमंत्र्यांनी केलेय.

संपूर्णपणे नक्षलभागातून जाणाऱ्या वडसा - देसाईगंज - गडचिरोली रेल्वे प्रकल्पाला मान्यता मिळाली असताना या प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी आर्थिक तरतुदीची मागणी केली आहे. ४९.५ किमी लांबीच्या प्रकल्पाचा खर्च ४५९ कोटी रूपयांच्या घरात आहे.

कराड - चिपळूण प्रकल्प

पश्चिम महाराष्ट्रातील कराड आणि कोकणातील चिपळूण प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास आंग्रे पोर्ट, जयगड यासारख्या बंदरातून देशाच्या कुठल्याही भागात मालवाहतूक करणे सोपे होणार आहे. तसंच कोकण रेल्वेला एक पूरक मार्ग उपलब्ध होणार आहे. सह्याद्रीच्या पोटातून जाणा-या प्रकल्पाची लांबी सुमारे ११० किमी असून २५००कोटी रुपयांच्या घरात खर्च अपेक्षीत आहे.

नागपूर - नागभीड़ रेल्वे मार्ग

नागपूर - नागभीड़ या नॅरोगेजचे परिवर्तन ब्रॉड गेजमध्ये झाल्यास नागपूर थेट गडचिरोलीला जोडले जाणार आहे. तर पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा सर्वे झाला असून या मार्गाचे काम सुरु झाल्यास या मार्गावरील भागांचा विकास होण्यास मदत होईल, असे या पत्रात सूचविण्यात आले आहे.

केंद्राकडून आता मुख्यमंत्र्याच्या पत्राची कशी दखल घेतली जाते याकडे लक्ष लागले आहे. राज्यात आणि केंद्रात एकच पक्षाचे सरकार असताना, परिस्थिति अनुकूल असताना आता राज्याच्या किती मागण्या पूर्ण होतात याची उत्सुकता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.