मुंबईत पोलीस असुरक्षीत, पोलिसाला बेदम मारहाण

कायद्याचा रक्षक असलेल्या खाकी वर्दीतल्या पोलिसाला दादरमध्ये भर पब्लिकमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. खेदाची बाब म्हणजे पोलिसाला मारहाण होत असताना, आम पब्लिक चक्क तमाशा पाहात बसले.

Updated: Nov 27, 2015, 08:21 PM IST
मुंबईत पोलीस असुरक्षीत, पोलिसाला बेदम मारहाण  title=

मुंबई : कायद्याचा रक्षक असलेल्या खाकी वर्दीतल्या पोलिसाला दादरमध्ये भर पब्लिकमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. खेदाची बाब म्हणजे पोलिसाला मारहाण होत असताना, आम पब्लिक चक्क तमाशा पाहात बसले.

दादरमध्ये भर गर्दीत पोलिसाला बेदम मारहाण पोलिसांच्या अब्रूची लक्तरे टांगणीला लागलीत. पोलीस मार खात होता... लोक 'तमाशा' बघत होते. हा प्रकार घडला दादरसारख्या गजबजलेल्या भागात. आणि तो देखील पोलीस ऑन ड्युटी असताना.

गुरूवारी रात्री दादर स्टेशनबाहेर फेरीवाल्या नवरा-बायकोचं भांडण सुरू होतं. भर रस्त्यात नवरा आपल्या बायकोला मारत होता. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दीपक बोलके तिथे मध्यस्थीसाठी गेले. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीत भांडण करणारे नवराबायको आणि त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस कॉन्स्टेबल बोलके यांच्यावरच हल्ला केला. या कॉन्स्टेबलनं आधी आपणाला मारहाण केली, असा त्यांचा आरोप आहे.

या मारहाणीत कॉन्स्टेबल बोलके जखमी झालेत. खेदाची बाब म्हणजे ऑन ड्युटी असलेल्या पोलिसावर हल्ला सुरू असताना, आजुबाजूचं पब्लिक केवळ 'तमाशा' बघत बसलं. पोलिसाला वाचवण्याऐवजी मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यातच गर्दीतल्या लोकांनी धन्यता मानली.

याप्रकरणी संबंधित फेरीवाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली. दादरसारख्या भर वस्तीत कायद्याची लक्तरं अशी वेशीवर टांगली गेल्यानं पोलीसही चक्रावलेत. मुंबईसारख्या शहरात पोलिसावरच हात उगारला जाऊ शकतो, तर सामान्यांच्या सुरक्षेचं काय, असा सवाल आता केला जातोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.