मुंबई : गिरगावात मेट्रो तीन प्रकल्पाचे बांधकाम स्थानिक रहिवाश्यांनी बंद पाडल्यानंतर मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी आणि मुंबई मेट्रो रेल कॉरपोरशन च्या प्रमुख अश्विनी भिडे यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि गिरगावातील प्रकल्पबाधीत रहिवासी ही या बैठकीला उपस्थित होते.
मेट्रो तीन प्रकल्पात गिरगाव आणि काळबादेवी हे स्टेशन ज्या ठिकाणी होणार आहे तिथल्या ११५ कुटुंबाचे आणि २५७ गाळेधारकांचे पुनर्वसन झालेले नाही. या स्थानिक रहिवाश्यांच्या पुनर्वसनासंदर्भात एमएमआरसीने कोणतीच योजना रहिवाश्यांना सांगितली नाही.
त्यामुळे पुनर्वसन न करता थेट मेट्रोच्या कामाला सुरवात केल्यामुळे स्थानिक रहिवाश्यांनी गिरगावात मेट्रो रेल्वेचे बांधकाम सोमवारी बंद पाडले होते. त्यानंतर काम सुरू करण्यासाठी आता एमएमआरसीचे अधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते.
या बैठकीत एमएमआरसी गिरगावातील प्रकल्पग्रस्त रहिवाश्यासाठी पुनर्वसन योजना गिरगावातच बांधणार आहे. तसेच रहिवाश्यांच्या इतरही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याचं आश्वासन जिल्हाधिकारी आश्विनी भिडे यांनी दिलं.
मान्य झालेल्या प्रमुख मागण्या
१) ५०० मीटरच्या आत पुनर्वसन होणार.
२) व्यावसायिक गाळेधारकांना २०% अधिक जागा देणार.
३) प्रकल्पबाधीत रहिवाश्यांना पूढील ४ वर्षाचे भाडे आगाऊ देणार.
गिरगावातील प्रकल्पबाधीत रहिवाश्यांच्या या प्रमुख मागण्या मान्य झाल्यावर, मेट्रो तीन चा मार्ग मोकळा होणार आहे.