शिक्षा सुनावतानाही `ते` एकमेकांकडे पाहून हसत होते

शक्तीमिल फोटोजर्नलिस्ट गँगरेपप्रकरणी तिघांना फाशी सुनावण्यात आलीय. विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना कोर्टानं फाशी सुनावली.... नेमकं काय घडलं कोर्टात...... हा निकाल सुनावताना कोर्ट काय म्हणालं आणि हा खटला इतर खटल्यांपेक्षा वेगळा का ठरला, त्याचाच हा रिपोर्ट...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2014, 09:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शक्तीमिल फोटोजर्नलिस्ट गँगरेपप्रकरणी तिघांना फाशी सुनावण्यात आलीय. विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना कोर्टानं फाशी सुनावली.... नेमकं काय घडलं कोर्टात...... हा निकाल सुनावताना कोर्ट काय म्हणालं आणि हा खटला इतर खटल्यांपेक्षा वेगळा का ठरला, त्याचाच हा रिपोर्ट...
 
याचं कारण म्हणजे, कलम ३७६ ई कलमाखाली विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलीम अन्सारी या तिघांना फाशी सुनावण्यात आलीय. दिल्लीतील निर्भयावर झालेल्या बलात्कारानंतर कायद्यात सुधारणा करून बलात्काराचा गुन्हा दुसऱ्यांदा करणाऱ्यांना कलम ३७६ ई अंतर्गत फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली होती... कलम ३७६ ई अंतर्गत सुनावण्यात आलेली देशातली ही पहिली फाशी आहे.
 
 
शिक्षा सुनावताना, काय म्हटलं कोर्टानं...
सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शक्तीमिल बलात्कारप्रकरणी अखेर तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशी सुनावताना कोर्ट म्हणालं.... `हा गँगरेप पूर्वनियोजित होता. मुली म्हणजे यांच्यासाठी शिकार होत्या, या तिघा आरोपींनी जाणीवपूर्वक गँगरेप केला. या तिघांनी याआधीही गँगरेप केलेत. या तिघांनी मानवी हक्कांची हत्या केलीय. त्यांना माफी नाही. यांना कायद्याचं भय अजिबात नव्हतं. अशा घटनांना आळा बसायलाच हवा. यांना जास्त शिक्षा दिली नाही, तर समाजात चुकीचा संदेश जाईल`

२२ ऑगस्ट २०१३ रोजी शक्तीमिलमध्ये फोटो जर्नलिस्टवर बलात्कार झाला होता. पण त्याआधी  एका टेलिफोन ऑपरेटरवर याच शक्तिमिलमध्ये याच तिघांनीही बलात्कार केला होता. फोटोजर्नलिस्ट गँगरेप प्रकरण उजेडात आल्यानंतर टेलिफोन ऑपरेटरही धाडसानं पुढे आली. या खटल्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कलम ३७६-ई अंतर्गत फाशी सुनावण्यात आलेला हा देशातला पहिलाच खटला ठरलाय. एकाच प्रकारचा गुन्हा वारंवार केल्यानंतर या ३७६ ई हे कलम लावण्यात येतं.
दिल्लीतल्या निर्भया गँगरेप प्रकरणानंतर तयार करण्यात आलेल्या नव्या कायद्यात या कलमाचा समावेश करण्यात आला. टेलिफोन ऑपरेटरनं पुढे येऊन धाडसानं ही तक्रार केली. त्यामुळेच आरोपींनी एकाच प्रकारचा गुन्हा वारंवार केल्याचं सिद्ध झालं आणि त्यांच्यावर ३७६ ई कलम लावता आलं.
त्यावेळीही ते एकमेकांकडे पाहून हसत होते...
 धक्कादायक बाब, म्हणजे ज्यावेळी कोर्टात शिक्षा सुनावली जात होती, त्यावेळी तिघेही दोषी एकमेकांकडे बघून हसत होते. या नराधमांना फाशी सुनावल्यामुळे असल्या प्रकारचे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत, हा स्ट्राँग मेसेज कोर्टानं दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.