लोकलच्या स्पीकरमध्ये ऐकू आले 'अश्लील’आवाज

अंधेरी ते ग्रॅन्ट रोडपर्यंतच्या लोकल प्रवासात गार्डच्या मोबाइलमध्ये सुरू असलेले ‘अश्लील’आवाजातील प्रकार लोकलमधील सर्व डब्यांतील प्रवाशांना ऐकू गेले आणि हे आवाज सहन न झालेल्या प्रवाशांनी याची तक्रार रेल्वेकडे करताच, या गार्डला निलंबित करण्यात आले. 

Updated: Oct 30, 2015, 09:08 PM IST
लोकलच्या स्पीकरमध्ये ऐकू आले 'अश्लील’आवाज  title=

मुंबई : अंधेरी ते ग्रॅन्ट रोडपर्यंतच्या लोकल प्रवासात गार्डच्या मोबाइलमध्ये सुरू असलेले ‘अश्लील’आवाजातील प्रकार लोकलमधील सर्व डब्यांतील प्रवाशांना ऐकू गेले आणि हे आवाज सहन न झालेल्या प्रवाशांनी याची तक्रार रेल्वेकडे करताच, या गार्डला निलंबित करण्यात आले. 

मंगळवारी दुपारी बोरीवलीहून चर्चगेटला जाण्यासाठी विशेष लोकल सोडण्यात आली. ही लोकल अंधेरीनंतर जलद होती. या लोकलवर एस. शर्मा हे गार्ड म्हणून कार्यरत होते. 

अंधेरीला लोकल येताच, शर्मा यांनी आपल्या केबिनमधूनच अंधेरीहून चर्चगेटला जाणारी जलद लोकल असल्याची माहिती प्रवाशांना माईकद्वारे दिली. ही माहिती दिल्यानंतर लोकल सुरू झाली. मात्र, मोबाइलवर ‘अश्लील’ प्रकार पाहण्यात दंग असलेले शर्मा हे आपल्या केबिनमधील माईकची यंत्रणा बंद करण्याचे विसरून गेले. त्यामुळे मोबाइलमधून येणारे चित्रविचित्र आवाज या लोकल ट्रेनच्या स्पीकरमधून बाहेर पडू लागले आणि ते प्रवाशांच्या कानी पडले. 

ही ट्रेन मुंबई सेन्ट्रल स्थानकानंतर धीमी असल्याने अंधेरीपासून ते ग्रॅन्ट रोड स्थानकापर्यंत चित्रविचित्र आवाजांचा प्रकार सुरूच राहिला. याची गंभीर दखल काही प्रवाशांनी घेतली आणि त्या विरोधात ग्रॅन्ट रोड स्थानकात स्टेशन मास्तरकडे तक्रार दाखल केली. यानंतर त्वरित सूत्र हलली आणि पश्चिम रेल्वेकडून गार्ड शर्मा यांना निलंबित करण्यात आले. याबाबत पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेन्द्र कुमार यांनी सांगितले की, ‘हा धक्कादायक प्रकार आहे. याची दखल आम्ही घेतली असून, गार्डला निलंबित केले आहे. या प्रकारची चौकशीही केली जाणार आहे.’

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.