दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई: विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा त्यांचंच भविष्य कसं बिघडवू शकतो याचा अनुभव बोरीवलीच्या एका कॉलेजच्या विद्यार्थिनीनं घेतला. या निष्काळजीपणाचा फटका तिला बसला आणि बारावीच्या परीक्षेत ती चक्क नापास झाली.
बोरीवलीच्या वालीया कॉलेजमध्ये शिकणारी ही दामिनी गोस्वामी... मे महिन्यात लागलेल्या बारावीच्या निकालानं तिला धक्काच बसला. ज्या विषयाची परीक्षा तिनx दिलीय त्या विषयाच्या परीक्षेला ती गैरहजर असल्याचं तिच्या १२ वीच्या निकालात दिसतंय.
तिच्या बारावीच्या निकालात ज्यात एन्व्हायरमेंट एज्यूकेशन याविषयाच्या परीक्षेत ती गैरहजर असल्याचं दाखवलंय. 50 मार्काची इंटर्नल परीक्षा असलेल्या या विषयासाठी १२ वीच्या विद्यार्थ्यांना एक प्रोजेक्ट आणि त्यासाठीची तोंडी परीक्षा द्यावी लागते. हे प्रोजेक्ट आणि तोंडी परीक्षा ११ फेब्रुवारीला घेण्यात आली. कॉलेजच्या रुम नंबर २८ मध्ये हे प्रोजेक्ट्स सबमीट करायचे होते. पण दामिनीचा गोंधळ उडाला आणि ती २८ ऐवजी रुम नंबर ८ मध्ये गेली. पण तिथे उपस्थित असलेल्या शिक्षिकेनं चक्क तिचा प्रोजेक्ट स्वीकारला. त्यावर सही देखील केली. तिची तोंडी परीक्षाही घेतली. त्यामुळे आपण चुकीच्या रुममध्ये आलोय. हे दामिनीच्या लक्षातच आलं नाही.
चुकीच्या रुममध्ये जावूनही दामिनीनं प्रोजेक्ट आणि तोंडी परीक्षा दिली असल्यामुळे तिला गैरहजर मानू नये, असं तिच्या पालकांचं म्हणणं आहे. दामिनीचे पालक गेले महिनाभर बोरीवलीच्या वालीया कॉलेजचे खेटे मारतायत. पण कॉलेज काही दाद देत नाहीय.
याप्रकरणी आम्ही कॉलेजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कॉलेजनं कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. या प्रकरणात दामिनीकडून चूक झाली असेल तर चुकीच्या वर्गात जाऊनही तिची परीक्षा घेणाऱ्या कॉलेजची काहीच चूक नाही का? तिचे प्रोजेक्ट का तपासले? आणि असे झालंच नसेल तर मग कॉलेज त्या वर्गाचं हजेरी रजिस्टर पालकांना दाखवत का नाही? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच राहतात. एवढ्या छोट्याशा चुकीमुळे एका विद्यार्थिनीला १२ वीसारख्या महत्वाच्या परीक्षेत नापास व्हावं लागतं, याला दुर्दैव नाहीतर आणखी काय म्हणायचं...?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.