अखेर ‘एमपीएससी’ची परीक्षा पुढे ढकलली!

दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही सगळा डॅटा पूर्ववत न झाल्यानं अखेर ही येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2013, 04:02 PM IST

www.24taas.com, मुंबई
ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘एमपीसीएससी’चा साईटवर व्हायरस शिरल्यानं डाटा करप्ट झाला आणि प्रशासन-विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला. दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही सगळा डॅटा पूर्ववत न झाल्यानं अखेर ही येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मुख्यमंत्री आणि विरोधकांच्या बैठकीत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. थोड्याच वेळात ही परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल. राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व्हरमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे आयोगाच्या सर्व्हरमधील माहिती नष्ट झाली होती. त्यामुळे परीक्षा किमान १५ दिवस पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. तशीच मागणी विरोधी पक्षांच्या आमदारांनी बुधवारी विधान परिषदेत केली होती. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यास नकार देत सांगितले होते की, परीक्षार्थीची माहिती पुन्हा अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना एसएमएस, ई-मेलद्वारे कळवण्यात येत आहे. तसंच विद्यार्थ्यांना प्रोफाईल अपडेट करण्यासाठीच्या मुदतीतही वाढ करण्यात आली आहे. परीक्षार्थी शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रोफाईल अपडेट करू शकतात. आता या परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे.

काही वेळापूर्वीच `MPSC परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते, आणि परीक्षा पाच ते दहा दिवस पुढे ढकलल्याने काहीही बिघडणार नाही’असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबच्या निर्णयाचे संकेत दिले होते.