दहशतवाद्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांमुळे होतात जास्त मृत्यू

मुंबई : 'मुंबईत झालेल्या २६/११ आणि १९९३ सालच्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जास्त व्यक्ती मृत्यूमुखी पडतात', अशी माहिती खुद्द मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. 

Updated: Mar 10, 2016, 07:24 PM IST
दहशतवाद्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांमुळे होतात जास्त मृत्यू title=

मुंबई : 'मुंबईत झालेल्या २६/११ आणि १९९३ सालच्या दहशतवादी हल्ल्यांपेक्षा भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे जास्त व्यक्ती मृत्यूमुखी पडतात', अशी माहिती खुद्द मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. 

टाइम्स ऑफ इंडिया'त आलेल्या वृत्तानुसार काही प्राणीप्रेमी संघटना कुत्र्यांच्या केल्या जाणाऱ्या नसबंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. कुत्र्यांची नसबंदी कायद्याने अधिकृत असली तरी त्याचा कुत्र्यांना खूप त्रास होतो असा युक्तिवाद त्यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. 

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार १९९३ चे बॉम्बस्फोट आणि २६/११ चे दहशतवादी हल्ले यात मिळून ४२१ जणांचा मृत्यू झाला तर १०२५ जण जखमी झाले. मात्र याच दोन दशकांत कुत्रा चावल्यामुळे ४२९ लोकांचा मृत्यू झाला तर तब्बल १३ लाख १२ हजार लोक जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या होणाऱ्या त्रासाची न्यायालयाला कल्पना यावी म्हणून ही तौलनिक आकडेवारी देण्यात आली. 

महापालिकेची बाजू मांडणारे वकील नाफडे यांनी प्राणीमित्र संघटनांच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. आता न्यायालयानेही या भटक्या कुत्र्यांचा त्रास वाचवण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येऊ शकतात यासाठी सर्व राज्य सरकारे आणि महापालिकांकडून सूचना मागवल्या आहेत.