गणेशोत्सवासाठी तुम्ही दिलेली वर्गणी नक्की जाते तरी कुठे?

गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरुप गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदललंय. खासकरुन मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव म्हणजे एक इव्हेंट झालाय. पण 10 दिवसांसाठी लाखो रुपये खर्च येणाऱ्या या इव्हेंटसाठी नक्की पैसे येतात तरी कुठून?

Updated: Sep 23, 2015, 11:40 PM IST
गणेशोत्सवासाठी तुम्ही दिलेली वर्गणी नक्की जाते तरी कुठे? title=

मुंबई : गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वरुप गेल्या काही वर्षात पूर्णपणे बदललंय. खासकरुन मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव म्हणजे एक इव्हेंट झालाय. पण 10 दिवसांसाठी लाखो रुपये खर्च येणाऱ्या या इव्हेंटसाठी नक्की पैसे येतात तरी कुठून?

पारंपरिक आणि साधेपणाने साजऱ्या होणाऱ्या उत्सवांचं रुप आता बदललंय. मुंबईतल्या गल्लोगल्ली मंडप, रोषणाईनं सजलेले रस्ते, जाहिरातींचे शेकडो बॅनर आणि लाऊड स्पिकरचा हादरवून टाकणारा आवाज... असं चित्र दिसलं की याठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना धुमधडाक्यात करण्यात आलीय असं आता समजलं जातं.

पूर्वी गणेशोत्सवासाठी रहिवाश्यांनी दिलेल्या काही हजार रुपयांच्या वर्गणीतून गणेशोत्सव साजरा व्हायचा. पण आता गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर हजार नव्हे लाखो रुपयांचा खर्च येतो. हल्ली बहुते गणेशोत्सव मंडळ 'डीजे'ही अगोदरच बुक करून ठेवतात. या संपूर्ण सोहळ्यात सर्वाधिक पैसे खर्च होतात ते डीजेच्या तालावर नाचण्यासाठी...

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्या त्या भागातले गणेस भक्त म्हणजेच तिथले रहिवासी वर्गणी देत असतात. पूर्वी 51 रुपये दिली जाणारी वर्गणी आता 351 ते अगदी 500 रुपयांपर्यंत दिली जाते. गणरायाच्या श्रद्धेपोटी आणि आपल्या परिसरातला उत्सव आहे या भावनेनं रहिवासी वर्गणी देतात. पण हे पैसे गणरायाच्या भक्तीसाठीच खर्च होतात का? असा प्रश्न त्यांनाही पडतो.

मंडळांना पैसे कुठे खर्च केले? हे विचारायचीही चोरी... तर काही ठिकाणी वर्गणी कुठे खर्च होते... हे डीजे आणि रोषणाईच सांगते... त्यामुळे आजकाल वर्गणी देतानाही भाविक चार वेळा विचार करतात. 

हल्लीच्या मागणीनुसार गणेशोत्सव साजरा करायचा असोल तर दहा दिवसांत तब्बल 10 लाखाहून अधिक खर्च येतो. त्यासाठी वर्गणी तर जमा केलीच जाते पण त्याशिवाय जाहिराती आणि स्थानिक नेते देणगीही देतात... आणि त्यामुळेच मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांना हवा तसा गणेशोत्सव साजरा करता येतो. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.