अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: पिंपरी-चिंचवड भागातील पवना, इंद्रायणी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी उगमस्थानापासूनच या नद्यांची स्वच्छता करण्याची गरज लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेनं पुढाकार घ्यावा. महापालिकेनं यासंबंधीचा फेर प्रस्ताव शासनाकडं सादर करावा. राज्याकडून तो तातडीनं केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिली.
पिंपरी चिंचवडमधील पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी सुधार योजना प्रकल्पासंदर्भात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी श्री. बापट बोलत होते. यावेळी प्रधान सचिव सीताराम कुंटे, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे पी. अनबलगन, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला भाऊसाहेब धराडे सुद्धा उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बापट म्हणाले की, नदी सुधार प्रकल्पाचा केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव त्रुटींमुळं परत आला असून त्यातील त्रुटी दूर करून तो तातडीनं केंद्राकडे सादर करावा. हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. पवना आणि इंद्रायणी नदीत सांडपाणी आणि घाण पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी. महापालिकेनं सांडपाणी आणि मैला शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेनं राबवून नदीत सांडपाणी सोडण्यावर प्रतिबंध घालावा. तसंच सुधार प्रकल्पातील अपूर्ण कामं महापालिकेनं तातडीनं पूर्ण करण्यासाठी पावलं उचलावीत.
आळंदीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात श्री. बापट म्हणाले की, आळंदीची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी संपविण्यासाठी स्वतंत्र नियोजन करावं. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून त्यासाठी काही तरतूद करता येतं का हे तपासावं. तसंच भामा आसखेड योजना पूर्ण करण्यासाठी आळंदी नगरपालिकेनं तातडीनं पावलं उचलावीत.
पर्यावरण मंत्री श्री. कदम म्हणाले की, नदी सुधार प्रकल्पासंदर्भातील फेर प्रस्ताव तातडीनं सादर करावा. पर्यावरण विभाग तो केंद्र शासनाकडे लगेच पाठवेल. पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीत सांडपाणी आणि घाण पाणी टाकणाऱ्या उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत आणि त्यासंबंधीचा अहवाल तातडीनं सादर करावा. तसंच शहरातून सांडपाणी नदीत सोडलं जात असल्यास महापालिकेनंही योग्य ती कारवाई करावी.
आणखी वाचा - 'रात्री झोपताना तुम्ही ज्या व्हिडिओ क्लिप पाहता त्याच मीही पाहतो'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.