www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय ९ मार्चला जाहीर होणार आहे.
मनसेच्या उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आली आहे. राज-गडकरी यांच्यात झालेल्या भेटीनंतर शिवसेनेने केलेल्या टीकेने राजकारणातील समिकरणं बिघडली आहेत. आता मनसेने शिवसेनेला दणका देण्याची तयारी सुरू केली असून शिवसेना उमेदवारांसमोर मनसेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर भाजपबाबत मनसेचा सॉफ्ट कॉर्नर ठेवला असून त्यांच्या विरोधात उमेदवार देतील की नाही याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाही.
शिवसेनेचा युवानेता मनसेच्या संपर्कात
दरम्यान, शिवसेनेचा एक युवानेता मनसेच्या संपर्कात असून निवडणुकीत मनसे शिवसेनेला हादरा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बाळा नांदगावकर, प्रवीण दरेकर, वसंत गीते, रमेश पाटील लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे.
मनसेच्या यादीत सिनेतारेही ?
मनसेच्या या यादीत सिनेतारेही असण्याची शक्यता आहे. यात शिवाजी महाराज फेम डॉ. अमोल कोल्हे आणि महेश मांजरेकर यांनाही उमेदवारी देण्याचा विचार आहे.
मनसेची चर्चेतील संभाव्य नावे
- दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर / मोहन रावले
- द. मध्य मुंबई – आदित्य शिरोडकर
- उत्तर-पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर / शालिनी ठाकरे
- उत्तर मुंबई – प्रवीण दरेकर / प्रकाश दरेकर
- कल्याण – रमेश पाटील
- नाशिक – वसंत गिते / डॉ. प्रदीप पवार
- पुणे – दीपक पायगुडे की सिनेसृष्टीतील चेहरा
- शिरूर – डॉ. अमोल कोल्हे
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.