मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी संघर्ष प्रतिष्ठानच्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांना आमंत्रित केल्याने आता वातावरण तापू लागलं आहे.
शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आव्हाडांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी गुलाम अलींना ठाण्यात बोलावूनच दाखवावे असा खुला इशारा दिला आहे. तर आता या वादात मनसेनेही उडी घेतली आहे.
मनसेचे उपाध्यक्ष आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांना 'हिम्मत असेल तर गुलाम अली यांचा कार्यक्रम ठाण्यात घेऊनच दखवा" असा मनसे ईशारा दिला आहे. 'कार्यक्रमादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची राहिल, राज्यातलं शांत वातावरण बिघडवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे' अशी माहिती त्यांनी झी मीडियाशी बोलतांना दिली.
मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख सल्लागार अभिजीत पानसे यांनी 'देशद्रोही' जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रम केलेच तर आमचे सहकारी तो उधळूण लावतील असे म्हटले आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापू लागलं आहे.