एक बंगला हवा न्यारा! दुष्काळ सोडून बंगल्यांवर उधळपट्टी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेल्या मदतीपैकी साधा रूपयाही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. याउलट मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवर मात्र लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. आघाडी सरकारच्या काळात मंत्र्याच्या उधळपट्टीवर नाकं मुरडणारेच आता काटकसरीचा मंत्र विसरून गेलेत.

Updated: Jan 13, 2015, 11:31 PM IST
एक बंगला हवा न्यारा! दुष्काळ सोडून बंगल्यांवर उधळपट्टी title=

मुंबई: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेल्या मदतीपैकी साधा रूपयाही अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही. याउलट मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवर मात्र लाखो रुपयांचा खर्च केला जातोय. आघाडी सरकारच्या काळात मंत्र्याच्या उधळपट्टीवर नाकं मुरडणारेच आता काटकसरीचा मंत्र विसरून गेलेत.

काही बंगल्यात सुरू असलेलं फर्निचरचं काम... काही ठिकाणी जुनं पाडून नव्यानं बांधकाम... तर काही ठिकाणी आधीचा रंग चांगला असतानाही, नवा रंग काढण्याची धामधूम... ही हौसमौज सुरू आहे ते जनतेचे सेवक असलेल्या मंत्री महोदयाच्या बंगल्यात... मंत्री नवीन, मग बंगले जुने, असं कसं चालेल..? म्हणूनच की काय अगदी एक-दोन वर्षापूर्वी रंगरंगोटी झालेल्या, फुल्ली फर्निचर्ड असलेल्या शासकीय बंगल्यातही नुतनीकरण सुरू झालंय... ते ही जनतेच्या पैशातून.... या उधळपट्टीबाबत थेट विचारणा केली, तर मंत्र्यांकडं उत्तरं तयार आहेत. मंत्रिमहोदया विद्या ठाकूर म्हणतात,  मी आधीच्या सरकारमध्ये नव्हती... आणि रिनोव्हेशन नाही तर फक्त साफसफाई होतेय.

आघाडी सरकारमधील काँग्रेस राष्ट्रवादीच्या १५ हून अधिक मंत्र्यानी १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत १ कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी बंगले नुतनीकरणावर खर्च केला होता. हे बंगले सुस्थितीत असतानाही मंत्र्यांच्या हट्टापोटी त्यांचं पुन्हा सुशोभिकरण सुरू झालंय. त्यावरून राष्ट्रवादीला चिमटा काढण्याची आयती संधी मिळालीय..

विरोधी बाकावर असताना सरकारच्या वायफळ उधळपट्टीविरूद्ध आवाज उठवणारे सेना भाजपचे नेते आता मंत्री बनताच सगळं विसरले की काय, अशी शंका निर्माण होते.

राज्यावर ७२ हजार कोटीपेक्ष जास्त कर्जाचा बोजा आहे. राज्यात विकास कामाला निधी उपलब्ध होताना अडचणी आहेत. त्यात अवकाळी आणि दुष्काळी पावसांनी शेतकऱ्यांना डोळ्यात पाणी आणलंय. हे सगळ असताना मंत्र्याना मात्र स्वतःच्या चैनीसाठी जनतेचा पैसा खर्च करताना दिसतायत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.