`मेट्रो-३`च्या भुयारी मार्गाचं काम लवकरच सुरू

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... मेट्रो एकचं अजून उदघाटन झालं नसलं तरी मेट्रो तीनचं काम जानेवारी २०१५ मध्ये सुरू होणार आहे. याचं वैशिष्ट्यं म्हणजे मुंबईतील हा पहिला भूमिगत मेट्रोचा मार्ग असेल.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 23, 2014, 10:38 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... मेट्रो एकचं अजून उदघाटन झालं नसलं तरी मेट्रो तीनचं काम जानेवारी २०१५ मध्ये सुरू होणार आहे. याचं वैशिष्ट्यं म्हणजे मुंबईतील हा पहिला भूमिगत मेट्रोचा मार्ग असेल.
कुलाबा-सीप्झ या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं काम जानेवारी २०१५ मध्ये सुरू होणार आहे. `एमएमआरडीए`नं ही घोषणा केलीय. या प्रकल्पासाठीची टेंडर्स जुलै २०१४ मध्ये काढण्यात येणार आहेत. तर या प्रकल्पाचं कॉन्ट्रॅक्ट ऑक्टोबर २०१४ मध्ये देण्यात येईल. मेट्रोच्या या तिसऱ्या टप्प्यासाठीच्या कार शेडसाठी गोरेगावातल्या आरे कॉलनीत ३० हेक्टर जागाही निश्चित करण्यात आलीय.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.कडून (एमएमआरसी) या मार्गासाठी अंतिम निविदा जुलै २०१४मध्ये मागवण्यात येणार असून ही प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबर २०१४ पर्यंत यशस्वी कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. `मेट्रो-३`च्या उभारणीसाठी जागतिक दर्जाच्या १४ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. इंजिनीअरिंग, प्रोक्युरमेंट आण‌ि कन्स्ट्रक्शन (ईपीसी) माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून ऑक्टोबर २०१४ पर्यंत यशस्वी निविदाकारास कंत्राट दिले जाईल.
सुमारे २३ हजार १३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणाऱ्या या प्रकल्पाला जपानची आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्था `जायका`, केंद्र सरकार आण‌ि प्राधिकरण एकत्रितपणे अर्थसहाय्य करणार आहे. एकूण रकमेपैकी ५७ टक्के कर्ज `जायका` उपलब्ध करून देणार असून उर्वरित रक्कम भारत सरकार आण‌ि प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्य सरकार उभारेल. यात केंद्र सरकार उपकर्जाच्या माध्यमातून ५० टक्के रक्कम तर ५० टक्के रक्कम प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्य सरकार उभारेल, असेही सेठ यांनी स्पष्ट केले. `मेट्रो-३`चा काही भाग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाखालून जात असल्याने प्रकल्पातील ७७७ कोटी रुपयांचा खर्च विमानतळ लि. कडून मिळणार आहे. प्रकल्पासाठी होणाऱ्या खर्चाची थेट भरपाई करणे किंवा अन्य स्थानिक करातून सूट देणे, असे विविध पर्याय सध्या प्राध‌िकरणामार्फत पडताळून पाहिले जात आहेत.

मेट्रो - ३ ची स्टेशन्स...
कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी मेट्रो, सायन म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दिविनायक, दादर मेट्रो, शीतलादेवी मंदिर, धारावी, बीकेसी मेट्रो, विद्यानगरी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी एअरपोर्ट (स्थानिक), सहार रोड, छत्रपती शिवाजी एअरपोर्ट (आंतरराष्ट्रीय), मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ आण‌ि आरे कॉलनी.
कुलाबा-सीप्झ मेट्रोमध्ये एकूण २७ स्थानके असतील. त्यापैकी २६ स्थानके भुयारी असतील. गोरेगाव येथील आरे कॉलनी स्थानक जमिनीवर असेल. भुयारी स्थानके सरासरी १५ ते २५ मीटर खोल असतील. बांधकाम एकूण सात भागांत विभागले जाईल व १४ विविध ठिकाणी बांधकामाची सुरुवात होईल. सन २०२१मध्ये ताशी प्रत्येक दिशेला ३९ हजार प्रवासी प्रवास करतील (दिवसाला १३.९ लाख प्रवासी) आण‌ि सन २०३१ मध्ये दिवसाला १७ लाख प्रवासी प्रवास करतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.