मुंबई : शिवाजी पार्कमधील ऐतिहासिक महापौर निवासस्थान आता सोडावं लागणार असल्यानं मुंबईच्या महापौरांसाठी आता नव्या निवासस्थानाची शोधाशोध सुरू झालीय.
ताडदेवच्या कंबाला हिलमधील आयुक्तांच्या निवासस्थानापेक्षा भायखळ्याच्या राणीच्या बागेतील अतिरिक्त आयुक्तांचे निवासस्थान महापौर निवासासाठी अग्रक्रमावर आहे. परंतु असं झाल्यास वर्दळ वाढून इथल्या प्राण्यांना अधिक त्रास होणार आहे. तसंच वन विभागाचे अनेक नियम पायदळी तुडवले जाणार आहेत. ब्रिटीशांनी मौजमजेसाठी, पार्ट्या करण्यासाठी हा बंगला बांधला होता.
राणीबागेतला हा बंगला १९३१ साली बांधला गेला. ब्रिटीशांनी मौजमजेसाठी, पार्टीसाठी या बंगल्याचा वापर कॅफेटेरीया म्हणून केला होता. त्या उद्देशानंच हा बंगला बांधण्यात आला. १९७४ पासून हा बंगला महापालिकेतल्या प्रशासकिय अधिकाऱ्यांचं निवासस्थान बनला. या बंगल्यात याआधी माजी अतिरीक्त महापालिका आयुक्त असिम गुप्ता यांचं वास्तव्य होतं. बंगल्याच्या परिसराचं एकूण क्षेत्रफळ १७ हजार चौरस फुट इतकं आहे. तर बंगल्याचं बांधकाम ६ हजार चौ.फुट जागेवर आहे. बंगल्यात खाली चार वरच्या मजल्यावर चार अश्या एकूण आठ खोल्या आणि दोन हॉल (सभागृह) आहेत. मात्र, सध्याच्या शिवाजी पार्कवरच्या महापौर बंगल्यापेक्षा महापौरांच्या या नवीन संभाव्य निवास्थानाची शान अगदीच तोकडी आहे.
शिवाजी पार्कवरील महापौर बंगला आणि राणीबागेतलं हे संभाव्य निवास्थान काय फरक आहे पाहुया...
शिवाजी पार्क बंगला - ४० हजार चौफूट एरिया
संभाव्य बंगला - १७ हजार चौ. फूट
शिवाजी पार्क बंगला - मालाड स्टोन - मालाडमधल्या खदानीतून आणलेल्या दगड़ाने बनवलेला हा बंगला आहे.
संभाव्य बंगला - साधी बांधणी असेल.
शिवाजी पार्क बंगला - हेरिटेज ग्रेड २ प्रॉपर्टी, आलिशान ग्राउंड प्लस वन वास्तू, मागे समुद्रकिनारा, बंगल्याबाहेर विस्तिर्ण मोकळा प्रदेश, अद्ययावत सुरक्षायंत्रणा, मोठे प्रवेशद्वार
संभाव्य बंगला - बंगला राणीबागेच्या अंतर्गत भागात असेल. दुसऱ्या बाजुला एस. पाटणवाला हा वाहतूकीचा मार्ग, सुरक्षेच्या दृष्टीनं अडचणीचं तसंच, वाहनांच्या आणि अभ्यंगतांच्या गर्दीच्या दृष्टीनं गैरसोयीची जागा आहे.
शिवाजी पार्क बंगला - वरच्या मजल्यावर ३ दालन, महापौरांचं २ बेडरूम्स निवासस्थान, एक अभ्यंगताच्या बैठकीची खोली. तळ मजल्यावर कॉन्फरन्स रूम, पोचखाना (हॉल), अभ्यंगताची खोली उजव्या बाजूला लिफ्ट आहे, अद्यायवत सोयीसुविधा
संभाव्य बंगला - जुनाट बांधणी, सोयी सुविधा नाहीत, लहान आकाराच्या एकूण आठ खोल्या आणि दालनेही तुलनेनं लहानच आहेत.
शिवाजी पार्क बंगला - राजस्थानी जोधपुरी बनावटीची वास्तू
संभाव्य बंगला - बांधणी साधी, कोणतीच अंतर्गत गृह सजावट नाही
शिवाजी पार्क बंगला - ३८ नारळाची झाडं आणि प्रशस्त बाग आहे. गुलमोहर, पारिजात, वड आणि आंब्याची झाडं आहेत.
संभाव्य बंगला - बंगल्याच्या बाजूला मोकळी बाग आहे, तेथेच घरकामगार आणि माळी काम करणाऱ्या कामगारांच्या खोल्या आहेत.
शिवाजी पार्क बंगला - अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्ग्जांचा सहवास लाभलेली वास्तू आहे.
संभाव्य बंगला - बंगल्याचा ब्रिटीशांनंतर महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त, गार्डन सुपरिटेंडन्ट यांसारख्या अधिकाऱ्यांनी वापर केलाय.
शिवाजी पार्क बंगला - शिवसेना आणि भाजपच्या अनेक महत्त्वाच्या बैठकी या वास्तूंत पार पडल्या. त्याचबरोबर शिवसेनेच्या अंतर्गत आणि अतिशय वादळी बैठकी पार पडल्या. त्यामुळे या वास्तुला एक वेगळं राजकीय महत्व आहे.
संभाव्य बंगला - ब्रिटीशांनी हा बंगला मौजमजेसाठी कॅफे म्हणून बांधला... जी वास्तु ऐशआराम आणि मौजमजेसाठी बांधली गेली त्यात मुंबईच्या प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांना स्थान मिळणं ही नामुष्की.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.