राज्यात नवी समीकरणं उदयास येणार?

राज्यात नवीन राजकीय समीकरणं आकाराला येण्याची शक्यता आहे. नवीन राजकीय घडामोडींच केंद्र पुन्हा एकदा बारामती असणार आहे. 

Updated: Jan 21, 2015, 06:15 PM IST
राज्यात नवी समीकरणं उदयास येणार? title=

मुंबई : राज्यात नवीन राजकीय समीकरणं आकाराला येण्याची शक्यता आहे. नवीन राजकीय घडामोडींच केंद्र पुन्हा एकदा बारामती असणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. यातील महत्वाची बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी बारामतीत येणार आहेत. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या १४ तारखेला नरेंद्र मोदींचा संभावित दौरा होणार आहे. या दौऱ्या दरम्यान शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळतेय. याच दौऱ्याच्या तयारीसाठी शरद पवार यांनी आज ( बुधवार, २१ जानेवारीला ) पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांची बारामती येथे बैठक घेतली. 

या बैठकीला देखील तांत्रिक अडचण होती. शरद पवार यांच्याकडे सध्या सत्तेचं कोणताही पद नाही. त्यामुळे, पवारांनी बोलावल्यानंतर हे अधिकारी त्यांच्याकडे बारामतीला बैठकीला जातील का याबाबत शंका होती. 

ही बाब लक्षात आल्यानंतर खुद्द पवारंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हि अडचण घातली. त्यानंतर चक्र फिरली आणि  मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांच्या मार्फत या अधिकाऱ्यांना बारामतीला पवारांकडे बैठकीला जावे, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानुसार बारामती मध्ये शरद पवार यांनी या अधिकाऱ्यांबरोबर नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळतेय. 

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी बारामती मध्ये सभा घेण्याचे टाळले होते… लोकसभा निवडणुकीतील हि चूक मोदींनी विधानसभा निवडणुकीत दुरुस्त केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती मध्येच मोदींनी जंगी सभा घेतली. 

शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली. बारामती म्हणजे पवारांची जहागिरी आहे का?, असा सवाल करत, बारामतीच्या जनतेला पवारांच्या गुलामगिरी मधून मुक्त करण्याची घोषणा देखील मोदींनी केली होती.

तेच मोदी आता पवारांच्या निमंत्रणावरून बारामतीमध्ये येत आहेत. या दौऱ्यात पवारांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात देखील ते सहभागी होतील. त्यावेळी पवारांवर टीका करतील अशी शक्यता नक्कीच नाही. उलट, पवारांच्या कार्याचे, कर्तुत्वाचे गोडवेच नरेंद्र मोदींकडून ऐकायला मिळतील , अशीच शक्यता अधिक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.