मुंबई : कामावर परत येण्यासाठी मार्डच्या डॉक्टरांना आणखी किती बळी हवे आहेत हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण पन्नासहून अधिक जणांचा मृत्यू झाला. पाच दिवस राज्याच्या आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या रुग्णांना उपचार मिळत नाहीत. तरी सुद्धा डॉक्टर कामावर रुजू झालेले नाहीत.
माननीय मुंबई उच्च न्यायालय, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मार्ड अशा सगळ्यांची आवाहनं निवासी डॉक्टरांनी पायदळी तुडवली आहेत. सलग पाचव्या दिवशी मुंबईतल्या सरकारी रुग्णालायतले निवासी डॉक्टर कामावर रुजू झालेले नाहीत. डॉक्टरांना सुरक्षेची लेखी हमी हवी आहे. हायकोर्टानं काढलेल्या निर्देशांनंही त्यांचं समाधान झालेलं नाही. सरकरानं लेखी आश्वासन द्यावं अशी निवासी डॉक्टरांची मागणी आहे. खरंतरं सरकारनं हायकोर्टासमोर महिन्याभरात राज्यभरातल्या रुग्णालयात सुरक्षा वाढवण्यात येईल असं मान्य केलं आहे. असं असलं तरी भूतकाळातला अनुभव बघता लेखी आश्वासन मिळाल्यावर 12 तास सुरक्षेची परिस्थिती नेमकी काय आहे, हे बघूनच कामावर येऊ असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.