अमोल पडेणकर, मुंबई : महापालिकेच्या मराठी शाळांना कालबाह्य ठरवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही बातमी आहे. मुलुंडच्या गोशाळा मार्ग शाळेच्या एका विद्यार्थिनीची कामगिरी फक्त तिचीच नव्हे तिच्या शाळेची, तिच्या पालकांची आणि साऱ्या महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावलीय.
ममता पवार असं या 'वीरबाले'चं नाव आहे. ममता महाराष्ट्रतली पहिली वीरबाला ठरलीय. राष्ट्रपती भवनात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती पुरस्कार रॅलीत राष्ट्रपतींच्या हस्ते तिला मानपत्र देण्यात आलं.
ममतानं तिच्या शिक्षिका आणि गाईड कॅप्टन स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपतीपदकावर आपलं नाव कोरलंय. ममताचे वडील संतोष पवार मुलुंड स्टेशनवर गेली अनेक वर्ष चपला शिवण्याचं काम करतात... पण, आज मात्र त्यांचा उर आपल्या मुलीनं यशानं भरून आलाय. ममताला शिकवताना पवार कुटुंबाची आर्थिक ओढाताण होते... खरी पण तिला मिळालेल्या पुरस्कारानं त्यांचा सगळा शीण निघून गेल्याचं ते सांगतात.
ममता मिळालेला 'वीरबाला' पुरस्कार मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांचे अडथळे पार करताना साऱ्या देशातल्या मुलींशी स्पर्धा करावी लागते. बरं ममताचं यश फक्त स्काऊट आणि गाईड पुरतं मर्यादित नाही... अभ्यासातही तिला नंबर वरचा आहे. कुठल्याही खासगी शिकवणीशिवाय, तिनं दहावीत ८२ टक्के गुण मिळवलेत.
ममताच्या यशामुळे महापालिकाच्या शाळांवर लागलेला अकार्यक्षमतेचा कलंकही दूर होण्यास मदत होणार आहे. शिवाय मराठी शाळेत शिकून, घरची प्रतिकूल परिस्थिती अशा अडचणींवर मात करण्याची इच्छा असेल तर उत्तंग शिखरं सहज पार करता येतात... हेच ममताच्या यशानं अधोरेखित होतं.