www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राजू शेट्टी यांना अटक केली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा महायुतीनं दिलाय. त्यामुळं शेट्टी यांना अटक झाली तर निवडणुकीच्या तोंडावर जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत.
`जेव्हा मोहन पवार हे जखमी झाले तेव्हा राजू शेट्टी तुरुंगात होते... तुरुंगात असलेल्या व्यक्तीवर खुनाचा गुन्हा कसा काय लावला जाऊ शकतो?` असा प्रश्न उपस्थित करत गोपीनाथ मुंडे यांनी हा सरकारचा कट असल्याचं म्हटलंय.
स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेते राजू शेट्टी अडचणीत आलेत. २०१२ साली झालेल्या आंदोलनात जखमी झालेल्या एका पोलिसाचा मृत्यू झाल्यामुळे आता त्यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
१२ नोव्हेंबर २०१२ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला शिरोली इथं हिंसक वळण लागलं आणि त्यात सहाय्यक फौजदार मोहन पवार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. गेल्या दीड वर्षापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आंदोलनानंतर पोलिसांना जखमी केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि ८४ आंदोलकांवर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आता पवार यांचा मृत्यू झाल्यानं शेट्टींवर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झालाय.
राजू शेट्टी यांनी मात्र या आरोपांचा इन्कार केलाय. आपण महायुतीत गेल्यामुळे घाबरलेल्या सरकारचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आधी सदाभाऊ खोत आणि आता राजू शेट्टी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकल्याचं दिसतंय. एकूणच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निवडणूक मार्ग अधिक खडतर होण्याची चिन्हं यामुळे दिसत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.