मुंबई : शिवसेनेत इनकमिंग सुरूच आहे. त्यावर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेल्यांना शिवसेनेत का प्रवेश दिला जात आहे असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय. तर शुद्ध अंत:करणाने येणारे आणि कच न खाता निवडणुकीला सामोरे जाणा-यांनाच शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे असं शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी स्पष्ट केलंय.
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपने आघाडीच्या नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा लावल्यानं घटकपक्ष अस्वस्थ आहेत. विशेषतः घटक पक्षांनी ज्या जागांवर दावा केलाय तिथं त्यांचे आघाडीतले कट्टर विरोधक सेना-भाजपमध्ये दाखल होत असल्यानं राजू शेट्टींनी तर उघड नाराजी व्यक्त केलीय.
पश्चिम महाराष्ट्राच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गडाला लोकसभेत महायुतीनं हादरा दिल्यानंतर आता विधानसभेत अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात. आघाडीचं जहाज बुडू लागल्याचं दिसताच काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते महायुतीच्या जहाजात उड्या मारू लागलेत. शिवसेना-भाजपचं अस्तिव नसलेल्या मतदारसंघात दोन्ही पक्षांनी या नेत्यांना प्रवेश देण्याचा धडाका लावला. या जागांवर सेना-भाजपची ताकद नसल्यानं राजू शेट्टींची स्वाभिमानी संघटना आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षानंही दावा केला आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीविरोधात काम करणाऱ्या नेत्यांच्या या शिवसेनाप्रवेशानं घटकपक्ष नाराज आहेत.
काही मतदारसंघावरून शिवसेना-भाजपमध्येही अस्वस्थता आहे. तासगावातून अजित घोरपडेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होताच हा मतदारसंघ वाट्याला असलेल्या शिवसेनेनं संतप्त प्रतिक्रिया दिली. विटा-खानापूरमध्ये गेल्या निवडणुकीत २० हजारावर मते घेणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी गेली काही वर्षे भाजपच्या साथीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली. पण शिवसेनेनं माजी आमदार अनिल बाबर यांना राष्ट्रवादीतून आयात केल्यानं त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं जाण्याची चिन्हं आहेत.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुण्यातील अनेक जागांवर अशा प्रवेशांनी महायुतीच्या घटकपक्षांतलीच अस्वस्थता वाढवलीय. त्यामुळे महायुतीत सुरु असलेलं इनकमिंग महायुतीची ताकद वाढवण्यापेक्षा महाडोकेदुखी ठरू शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.