राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. 

Updated: Jul 17, 2016, 09:11 PM IST
राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार title=

 मुंबई  : राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.  'सैराट' सरकारचा झिंगाट कारभार झाल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विखे-पाटल यांनी केला. तर घोटाळ्यांवरुन धनंजय मुंडे यांनी सरकारवर तोंड सुख घेतले. 

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेताना विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केली. या सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून लोकांना याड लागण्याची पाळी आली आहे. आता राज्यपालांनी दिग्दर्शकांच्या भूमिकेतून या पिक्चरचं पॅक अप करावं ,अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. 

तर दीड वर्षात ८ मंत्र्यांचे घोटाळे मांडले पण कारवाई काही झाली नाही. 'आप खाते रहो, मैं बचाता रहू' असा कारभार या सरकारचा चालू असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली.

भाजपाच्या अनेक मंत्र्यांविरोधात झालेले आरोप, त्यात नव्यानं मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या पाच मंत्र्यांविरोधातील प्रकरणं विरोधकांच्या हाती आहेत. त्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न, फसवी कर्जपुनर्गठन योजना असे अनेक मुद्दे विरोधकांकडे आहेत. त्यामुळेच हे अधिवेशन मुख्यमंत्र्यांची आणि भाजपाची कसोटी पाहणारं ठरणार आहे.