मुंबई : शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तर सरकार स्थिर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा का घेऊ नये? असा सवाल संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांनी केलाय. त्यामुळं शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का? या चर्चेला आणखीनच ऊत आलाय.
25 वर्षांनंतर युतीत सडल्याची जाणीव महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच कशी झाली? एवढी वर्ष सत्ता भोगलीत त्यावेळी शिवसेनेला याची जाणीव का नाही झाली? असा सवालही वैद्य यांनी केलाय.
दरम्यान, शिवसेना-भाजप युती तुटली असली तरी सद्यस्थितीला सरकार अस्थिर होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय. त्यामुळे आताच शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, हे स्पष्ट झालंय. गेली अडीच वर्ष शिवसेनेची भूमिका सत्तेत राहून सरकारच्या धोरणावर टीका करण्याचीच राहिली आहे. आता युती तुटल्यावर ही भूमिका आणखी तीव्र होणार हे स्पष्ट झालंय. उद्धव ठाकरे यांचे आदेश येताच, राज्यातले मंत्री राजीनामा देणार असल्याचं संजय राऊत त्यांनी म्हटलंय.