`जॉन्सन`चा परवाना रद्द!

मुलुंडमधल्या ‘जॉन्सन अॅड जॉन्सन’ कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी या निर्णयाला हिरवा झेंडा दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 27, 2013, 08:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुलुंडमधल्या ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ कंपनीचा परवाना रद्द करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी या निर्णयाला हिरवा झेंडा दिलाय. या पावडरच्या वापराममुळे भविष्यात कॅन्सरचा धोका असल्याचं ‘एफडीए’च्या तपासणीत आढळून आलंय.
‘जॉन्सन अॅड जॉन्सन’ कंपनीच्या मुलुंडच्या प्लान्टमध्ये उत्पादन घेतलं जाणाऱ्या अनेक प्रोडक्टसपैकी ‘जॉन्सन बेबी पावडर’ हेही एक प्रोडक्ट बनवलं जात होतं. ‘एफडीए’ला त्याची ‘स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिस’ कशी असेल हे लेखी कळवावं लागतं. कंपनीनं तसं लेखी कळवलंही होतं. ही पावडर डब्यात भरण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करण्यासाठी वाफेचा वापर केला जातो. तो केल्यानंतरही पावडरचे निर्जंतुकीकरण झाले नाही, हे लक्षात आल्यानंतर डब्यात भरलेली पावडर इथिलीन ऑक्साईड वापरून निर्जंतुकीकरण केली गेली. पण, त्यासाठी ‘एफडीए’कडून पूर्वपरवानगी घेतली नाही. कंपनीच्या मुलुंड प्लान्टमध्ये ही सोय उपलब्ध नव्हती, म्हणून बनविण्यात आलेले १ लाख ६० हजार डबे बाहेरून निर्जंतुकीकरण करून घेतले गेले. त्यासाठीदेखील परवाना घेतला गेला नव्हता. यामुळे एफडीएनं हा निर्णय घेतलाय.
कंपनीनं मनोहर नाईक यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावेळी कंपनीला त्यांचे म्हणणं मांडण्यासाठी पुरेशी संधीही दिली गेली. कंपनीनं बेकायदेशीररीत्या, जॉन्सन बेबी पावडरचे ‘इथिलीन ऑक्साईड ट्रिटमेंट रि-प्रोसेसिंग’ केल्याची चूक मान्य केली. तसंच बाजारात विक्री करण्यापूर्वी ‘टेस्टिंग फॉर रेसिडीयल इथिलीन ऑक्साईड कन्टेंन्ट’ ही चाचणी केली नसल्याचंदेखील मान्य केलं. त्यामुळे सहआयुक्तांचा आदेश कायम ठेवावा, असं नाईक यांनी म्हटलंय.

या उत्पादनामुळे लहान मुलांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिल होतं. मात्र, नाईक यांच्या निर्णयाने लहानग्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे. आपण सर्व कागदपत्र पाहूनच लोकहितासाठी हा निर्णय घेतला, असं नाईक यांनी म्हटलंय. ३० मार्च २०१३ रोजी 'जॉन्सन'च्या मुलुंड प्लान्टचा परवाना रद्द करण्यात आलाय. त्यामुळे या प्लान्टमध्ये काम करणाऱ्या कामगार मात्र अडचणीत आलेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.