राज्यात जकातीऐवजी एलबीटी लागू

राज्यातल्या अ, ब, आणि क वर्ग महापालिकांमध्ये आजपासून एलबीटी लागू होतोय. यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर महापालिकेत एलबीटी लागू होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 1, 2013, 02:52 PM IST

www.24taas.com,मुंबई
राज्यातल्या अ, ब, आणि क वर्ग महापालिकांमध्ये आजपासून एलबीटी लागू होतोय. यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर महापालिकेत एलबीटी लागू होणार आहे.
जकातीऐवजी एलबीटी लागू करण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय.. मात्र एलबीटीमधल्या जाचक तरतूदींना व्यापारी आणि महापालिकांनी विरोध दर्शवलाय. या विरोधात व्यापा-यांनी आजपासून बेमुदत बंद पुकारलाय. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर महापालिका क्षेत्रातल्या व्यापा-यांनी बंदला पाठिंबा दिलाय.
एलबीटीचे दर पूर्वी असलेल्या जकातीसारखेच ठेवण्यात आलेत. तसंच जीवनावश्यक वस्तूंना एलबीटीमधून वगळ्यात आलंय.. असं असलं तरी त्यात अनेक फायदे तोटे असल्याचं पालिकांचं म्हणणं आहे.. तर अंधारात ठेवून सरकारनं हा निर्णय घेतल्याचा आरोप व्यापा-यांकडून करण्यात येतोय. त्यामुळं एलबीटीच्या अमंलबजावणीबाबत संभ्रम कायम आहे... राज्यात सध्या ड वर्ग महापालिकांमध्ये एलबीटी लागू असून मुंबईत एक ऑक्टोबरपासून एलबीटी लागू होईल. ड वर्गापैकी सहा महापालिकांमध्ये एलबीटी वसूलीला स्थगिती मिळालीय.

राज्यात २६ महापालिका असून त्यापैकी १९ ड वर्गात आहेत. पुण्यातल्या प्रसिद्ध सारसबागच्या गणपतीला आज व्यापा-यांनी एलबीटी बंद होण्यासाठी महाआरती करुन साकडे घातले. एलबीटीविरोधात पुण्यातल्या बाजारपेठाही आजपासून बेमुदत बंद आहेत. त्याचा दैनंदिन व्यवहाराला मोठा फटका बसलाय. या प्रकरणी उद्या मंडईतील टिळक पुतळा ते महापालिका मोर्चाही आयोजित करण्यात आलाय.
एलबीटीच्या विरोधात नागपूरच्या व्यापा-यांनी आज बंद पुकारलाय. या बंदला नागपूरच्या १२५ व्यापारी संघटनासह भाजप व शिवेसेना या राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिलाय. त्यामुळे आज नागपूरची बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे.