जानकरांची अक्कल समजली, त्यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे

मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांचा अपमान केला आहे. याबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

Updated: Oct 12, 2016, 07:49 PM IST
जानकरांची अक्कल समजली, त्यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे  title=

मुंबई : मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांचा अपमान केला आहे. याबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

असभ्य भाषा वापरणाऱ्या जानकरांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी करण्याचा विचार आहे. त्याबाबत पक्ष नेत्यांबरोबर चर्चा करणार आहोत. जानकरांनी आमच्या नेत्याबाबत घाणेरडे शब्द वापरले आहेत. जानकरांना किती अक्कल आहे मला माहीत नाही. मात्र, काल राज्याने त्यांना अक्कल आणि अक्कल दाढपण नाही हे पाहिले, अशी बोचरी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

एमएलसी म्हणजे मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे असे ते म्हणाले. त्यांना एमएलसी धनगर समाजाचे नेते म्हणून मिळाले. दोन वर्ष सरकारला होत आहेत पण जानकर आरक्षण देऊ शकले नाहीत. जातीच्या नावावर मंत्रीपदाची दलाली तुम्ही घेतली का, ते जनतेला कळायला हवे. आम्हाला यापेक्षा खालच्या भाषेत बोलतां येईल पण यशवंतराव चव्हाण आणि पवारांनी ते आम्हाला शिकवले नाही, असे धनंजय मुंडे म्हणालेत.

एमएलसी हे विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. त्या सभागृहाचा अपमान जावकरांनी केला असेल तर त्याचे परिणाम अधिवेशनात भोगावे लागतील. हा विधिमंडळाचा अपमान आहे. जानकरांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिका-यांचाही अपमान केला आहे. यापुढे असे बोलायचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही, असा थेट इशारा यावेळी त्यांनी दिला.

भगवान गडाच्या पायथ्याला भाजपाचा मेळावा झाला. स्वत:चे नेतृत्व टिकवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. भगवानगडावर भाषण करण्याचा वारसा मिळाला पण तो टिकवता आला नाही. गडावरचा मेळावा लोक आणून पायथ्याला घ्यावा लागला. भाजपा, रासप आणि स्वाभीमानच्या नेत्यांनी गडाजवळ अशी बडबड केली आहे, असे ते म्हणालेत.