ती आग नव्हतीच... तो होता रेल्वेचा बेजबाबदारपणा!

अंधेरीहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या ट्रान्सफॉर्मरचे वंगण प्रवाशांवर पडल्याने ११ प्रवासी जखमी झालेत. लोकलच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचा दावा रेल्वेने केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 5, 2012, 08:30 AM IST

www.24taas.com, मुंबई
अंधेरीहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या ट्रान्सफॉर्मरचे वंगण प्रवाशांवर पडल्याने ११ प्रवासी जखमी झालेत. लोकलच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचा दावा रेल्वेने केलाय. मात्र, रेल्वेचा दावा फेटाळून लावत लोहमार्ग पोलिसांनी ब्रेक ऑईल लिक झाल्याने आग लागल्याचं म्हटलं आहे.
हार्बर मार्गावर अंधेरीहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये मंगळवापी दुपारी ११ वाजून २० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. रेल्वेच्या दाव्यानुसार ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आणि त्यातलं गरम वंगण प्रवाशांच्या अंगावर पडलं. या दुर्घटनेत ११ प्रवासी जखमी झाल्याचं कळतंय. त्यांच्यापैकी ३ प्रवासी ४५ टक्के भाजले आहेत. १० जखमींना जे.जे.रुग्णालयात तर एकाला सेन्ट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेमध्ये आग लागली नसून गरम वंगण पडल्यानं प्रवासी भाजल्याचा दावा रेल्वेने केलाय.
लोहमार्ग पोलिसांनी मात्र ब्रेक ऑईल लिक झाल्यानं घर्षणातून ठिणग्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे आग लागल्याचा दावा केलाय. रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलीस यांच्या वक्तव्यांवरुन या दुर्घटनेसंदर्भात गोंधळ असल्याचं स्पष्ट होतंय. रेल्वे या संदर्भात स्वतंत्र विभागीय तपास करत असल्यानं अहवाल आल्यानंतरच या घटनेचं नक्की कारण स्पष्ट होणार आहे.