www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जून २०१३ पासून आठ टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे मूळ पगाराच्या ८० टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना लागू होईल. १८ लाख कर्मचारी आणि सहा लाख पेन्शनर्सना त्याचा फायदा मिळेल.
केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आठ टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला असून त्यामुळे हा महागाई भत्ता ७२वरून ८० टक्के इतका झाला आहे. त्यात जिल्हा परिषद, पोलीस, शिक्षक आदींचाही समावेश आहे. ही वाढ मे महिन्याच्या पगारापासून दिली जाणार आहे . या निर्णयामुळे प्रत्येक संवर्गातील श्रेणीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारात किमान ६०० ते ३ हजार रुपयांची पगारवाढ अपेक्षित असल्याचं एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं माहिती दिलीय. जानेवारी ते एप्रिल २०१३ या चार महिन्यांच्या काळातील वाढीव महागाई भत्त्यापोटीची थकबाकीची रक्कम महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटातून बाहेर आल्यानंतर दिली जाण्याची शक्यता आहे.
पीएफ वर आता ८.५ टक्के व्याज मिळणार
गेले अनेक दिवस नोकरदार मंडळी वाट पाहत असलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या ( पीएफ ) व्याजदर वाढीचा निर्णय अखेर बुधवारी झाला. मागील आर्थिक वर्षासाठी ( २०१२ - १३ ) पीएफवर ८ . २५ टक्क्याऐवजी ८ . ५० टक्के इतके व्याज मिळणार आहे. या निर्णयाची अधिसूचनाही जारी झाली असून व्याजाच्या फरकाची रक्कम खात्यात तातडीने जमा केली जाणार आहे. पीएफचा व्याजदर हा आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच जाहीर होणे अपेक्षित आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.