मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरात धक्कादायक घटना घडलीये. पतीने आपल्या लहान मुलांच्या डोळ्यादेखत पत्नीची गळा चिरुन हत्या केलीये.
कांदिवलीत हनुमान नगरमधल्या पठाण चाळीत नितीन फुंडकर आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. नितीन फुंडकर यांना दारूचं व्यसन होतं. ते पत्नीला मारहाणही करत पण इतकं टोकाचं पाऊल उचलतील असं कुणालाच वाटलं नाही.
सोमवारी मध्यरात्री समीक्षाचे वडिल नितीन फुंडकर यांनी तिच्या आईची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वतः बायकोच्या साडीच्या सहाय्यानं आत्महत्या केली. हा सगळा प्रकार त्यांची मुलगी समीक्षानं डोळ्यानं पाहिला. त्यावेळी भाऊ युवराज झोपलेला होता. समीक्षानं त्याला उठवलं. रात्रभर दोघे रडत बसले. सकाळी या लहानग्यांनी सगळा प्रकार आजीला जाऊन सांगितला.
समीक्षा आणि तिच्या भावाच्या डोळ्यातले अश्रू आता आटलेत. पण आई वडिलांचं छत्र हरवताना स्वत:च्या डोळ्यानं बघण्याची वेळ आलेल्या समीक्षाची मनावर किती मोठा आघात झाला असेल याची कल्पनाही करणं अवघड आहे.