मुंबई-पुणेकरांना असा बसेल दुष्काळाचा फटका

राज्याने कधीही पाहिलं नाही एवढं भयानक दुष्काळाचं रूप समोर येणार आहे. १९७२ च्या दुष्काळाएवढी भयानकता जाणवणार नाही. पण तीव्रता त्याच्या आसपास जाऊन पोहोचणारी आहे. मुंबई-पुण्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला, दूध, फळं आणि कांदा यासारख्या वस्तूंचे भाव आणखी भडकण्याची चिन्ह आहेत.

Updated: Aug 23, 2015, 12:02 PM IST
मुंबई-पुणेकरांना असा बसेल दुष्काळाचा फटका title=

मुंबई : राज्याने कधीही पाहिलं नाही एवढं भयानक दुष्काळाचं रूप समोर येणार आहे. १९७२ च्या दुष्काळाएवढी भयानकता जाणवणार नाही. पण तीव्रता त्याच्या आसपास जाऊन पोहोचणारी आहे. मुंबई-पुण्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला, दूध, फळं आणि कांदा यासारख्या वस्तूंचे भाव आणखी भडकण्याची चिन्ह आहेत.

उत्तर भारतात प्रचंड पाऊस झाला, अगदी राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशातही पूर आले, पण महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्य कोरडीच आहेत.

हिरवा भाजीपाला महागणार
महाराष्ट्रात ऑगस्ट महिना संपायला आलाय, तरीही शेत शिवारात वाहून निघणारा पाऊस ७५ टक्के ठिकाणी झालेला नाही. मुंबई-पुण्याला राज्यातून भाजीपाल्याचा पुरवठा होता, मात्र राज्यात पाऊस नसल्याने विहिरींची पाणीपातळी खाली गेलीय. यामुळे भाजीपाला पिकाचं पिकवण्याचं प्रमाण घटणार आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्यानंतर भाजीपाला प्रचंड महागण्याची शक्यता आहे. 

कांदा कधी सावरणार?
कांदा पिक घेण्यासाठी पुरेसं पाणी लागतं, ते नसल्याची कांद्याची आवक घटणार आहे, मात्र उत्तर भारतात चांगला पाऊस झाल्याने काही महिन्यांनी म्हणजेच, तीन ते चार महिन्यांनी कांदा थोडा सावरू शकतो. 

मुंबई-पुण्याला पाण्याची चिंता सतावणार
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली नाहीत, तर मुंबईकरांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

डाळी ही महागण्याची शक्यता
महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसामुळे डाळींचं पिक धोक्यात आहे. डाळ आयात करण्याचे प्रयत्न असले तरी गरज किती पूर्ण होईल हा खरा प्रश्न आहे. दक्षिणेतील राज्य डाळ पिकवण्यात आघाडीवर आहेत, मात्र पावसामुळे त्यांचीच गरज पूर्ण होणार नसल्याचं दिसतंय.

दुधाचं उत्पन्न घटणार
पाऊस नसल्याने जनावरांना चारा आणि पिण्यासाठी पाणी हे मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आहे. माणसांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न असतांना गुरांचं काय हा मोठा प्रश्न असेल, गुरांना चारा आणि पाणी नसेल, तर दुधाचं उत्पन्न निश्चितच घटणार आहे. आहेत त्या गाई-म्हशींना आणि बैलांना जिवंत ठेवण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असणार आहे.

पाऊसच वाचवणार
मान्सूनच्या शेवटच्या सत्रात तीन-चार वेळेस पावसाने दुष्काळी भागाला झोडपून काढलं तरीसुद्धा ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारू शकते, आता फक्त आवश्यकता आहे ती पावसाचीच.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.