मुंबई : मध्यरेल्वे सामान्य प्रवाशांकडून कमाई करते... पण मिळकतीचं आणखी एक माध्यम मध्य रेल्वेला उपलब्ध आहे.
मुंबईकरांची लाईफ लाईन असलेली रेल्वे अनेक सिनेमांमध्ये झळकते. गेल्या वर्षभरात जवळपास १८ सिनेमे आणि टिव्ही सिरिअल्समध्ये मरे झळकली. केवळ पडद्यावर दिसण्यापुरतीच मरेची भूमिका नसते, तर या माध्यमातून रेल्वेला चक्क कमाईची संधी मिळतेय.
- सिनेमाच्या शुटींगमधून मध्य रेल्वेने २०१५-१६ या एका वर्षात ८१ लाख २१ हजार ७९४ रुपये कमवलेत.
- 'बागी' सिनेमाने पाच दिवसाच्या शुटींगसाठी २४ लाख ९७ हजार ७३२ रुपये मोजले.
- 'प्रेम रतन धन पायो'ने तीन दिवसांच्या शुटींगसाठी ८ लाख ९ हजार ७२ रुपये
- '२४' तमीळ फिल्मने एका दिवसासाठी ६ लाख ६० हजार ५१० रूपये
- 'जज्बा' या सिनेमाने पाच दिवसासाठी ६ लाख ४७ हजार ०६५ रूपये
- अशा एकूण १८ सिनेमा, टिव्ही सिरिअल, डॉक्यूमेंट्रीचे शुटींग मध्य रेल्वेच्या स्थानकांवर झालंय.
पनवेलजवळचं आपटा स्टेशन सिनेमाच्या शुटींगसाठी पॉप्युलर बनलंय. एकट्या आपटा स्थानकानं शुटींग भाड्यापोटी ३१ लाख ५८ हजार रुपये कमवलेत. त्यानंतर वाडीबंदर स्थानकानं वर्षभरात १३ लाख ८३ हजार कमवले. सीएसटी स्थानकालाही जोरदार पसंती असून वर्षभरात त्यासाठी ७ लाख ५९ हजार देण्यात आलेत. तसंच एलटीटी, लोणावळा, सातारामधील वठार रेल्वे स्टेशनचीही मागणी वाढतेय, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिलीय.
ज्या रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी मुंबईकर कपाळावर आठ्या आणतो त्याठिकाणी शुटींग करण्यासाठी सिनेमा निर्माते मात्र लाखो रुपये मोजतायत.
- ए-१ स्थानक म्हणजेच उपनगरी स्थानकांवर शुटिंगसाठी दिवसाचे १.२५ लाख रुपये द्यावे लागतात.
- एका कोचसाठी १५ हजार रुपये तर पाच कोचसाठी ४.५ लाख रुपये मोजावे लागतात.
- पॅसेंजर ट्रेनमध्ये एकदा चढण्याचे ३० हजार रुपये घेतले जातात. शुटींग जितकावेळ होईल त्याहिशेबाने पैसे वाढवले जातात.
- उपनगरी स्थानके सोडून इतर ठिकाणच्या शुटींगसाठी ५०-६० हजार रुपये घेतले जातात.
- शक्यतो रविवारच्याच दिवशी शुटींगसाठी परवानगी दिली जाते.
- तसंच शेवटची लोकल ते पहिली लोकल या काळातच शुटींग संपवण्याची परवानगी आहे.
मध्य रेल्वेच्या स्थानकांवर शुटींग करण्यासाठी दर गेल्या दहा वर्षात वाढवण्यात आलेले नाहीत. त्यात मध्य रेल्वे गेल्या वर्षभरापासून सिनेमांना रेल्वेचे आवश्यक साहित्य पुरवण्याचे काम करत आहे. त्यामुळे येत्या काळात मध्य रेल्वे शुटींगसाठी आपले दर वाढवण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या गोवा फेस्टीवलमध्येही मध्य रेल्वेने सहभाग घेतला होता. त्यामुळे सिनेमांमधून रेल्वेला अधिकाधिक प्रसिद्धी आणि कमाई व्हावी म्हणून रेल्वेनं सुरू केलेल्या प्रयत्नांना आता फळही मिळतंय.