वृद्ध व्यक्तीवर घोड्याचा हल्ला, आमदाराचा घोडा असल्याचा आरोप

एक वृद्ध सिक्युरिटी गार्ड घोड्यानं केलेल्या हल्ल्यात जबर जखमी

Updated: May 4, 2016, 07:05 PM IST
वृद्ध व्यक्तीवर घोड्याचा हल्ला, आमदाराचा घोडा असल्याचा आरोप title=

मुंबई : एक वृद्ध सिक्युरिटी गार्ड घोड्यानं केलेल्या हल्ल्यात जबर जखमी झाले आहेत. हा घोडा एका भाजप आमदाराचा असल्याचा आरोप केला जातोय. पोलिसांनी मात्र अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गणपत नेवळेकर मृत्यूशी झुंज देतायत. 62 वर्षांच्या गणपतरावांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. घोड्यानं हा हल्ला का केला, कुणालाच माहित नाही. नेवळेकर हिरानंदानी कॉलनीमध्ये सिक्युरिटी गार्डची नोकरी करतात.

मंगळवारी कामावरून परतत असताना समोरून 3 काळ्या रंगाचे घोडे दौडत आले. त्यातल्या एकानं नेवळेकरांच्या छातीवर जोरदार लाथ मारली. त्यामुळे ते खाली पडले. त्यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झालीये. हल्ला करणारा घोडा भाजप आमदार राम कदम यांच्या मालकीचा असल्याचा आरोप नेवळेकर यांच्या मुलानं केला आहे.

परिसरातल्या गरीब मुलांना रपेट घडवण्यासाठी कदम यांनी हे घोडे विकत घेतलेत. मात्र पोलिसांनी कदम यांच्याविरोधात तक्रार घेण्यास नकार दिल्याचा दावा प्रभाकर नेवळेकर यांनी केलाय. पोलिसांनी घोड्याच्या अज्ञात मालकाविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवलाय. 

पोलिसांनी आतापर्यंत ७ काळे घोडे पोलीस स्टेशनवर आणलेत. त्यांच्या मालकांकडे चौकशीही केलीये. मात्र गणपत नेवळेकरांवर हल्ला करणारा घोडा काही त्यांना सापडलेला नाही.