डॉ. होमी भाभांच्या ‘मेहरांगीर’चा 372 कोटींना लिलाव

भारताच्या अणुशक्ति संशोधनाचे प्रणेते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील आलिशान बंगल्याचा आज अखेर लिलाव झाला. या बंगल्याचं रूपांतर स्मारकामध्ये व्हावं, अशी मागणी होती. मात्र ही मागणी धुडकावून, एनसीपीएने डॉ. होमी भाभांचा हा वारसा 372 कोटी रूपयांना लिलावात काढला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 18, 2014, 06:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताच्या अणुशक्ति संशोधनाचे प्रणेते, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मुंबईतील आलिशान बंगल्याचा आज अखेर लिलाव झाला. या बंगल्याचं रूपांतर स्मारकामध्ये व्हावं, अशी मागणी होती. मात्र ही मागणी धुडकावून, एनसीपीएने डॉ. होमी भाभांचा हा वारसा 372 कोटी रूपयांना लिलावात काढला.

मेहरांगीर... मुंबईच्या मलबार हिल येथील 18 हजार चौरस फुटांचा हा आलिशान बंगला... हँगिंग गार्डनपासून हाकेच्या अंतरावर असलेला, हा सी-फेसिंग बंगला म्हणजे भारताच्या अणुशक्ति कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचं निवासस्थान.
1939 मध्ये डॉ. भाभांच्या वडिलांनी हा ब्रिटीशकालीन बंगला विकत घेतला. आई मेहरबाई आणि पिता जहांगीर यांच्या आठवणीखातर बंगल्याचं `मेहरांगीर` असं नामकरण झालं. 1966मध्ये होमी भाभांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू आणि एनसीपीएचे संस्थापक जमशेद भाभा यांच्याकडे या घराची मालकी होती.
जमशेद भाभांनी याच घरात 2007 मध्ये अखेरचा श्वास घेतला. आपलं अवघं आयुष्य एनसीपीएसाठी वेचलेल्या जमशेद भाभांनी आपल्या मृत्यूनंतर या जागेवर एनसीपीएची मालकी असेल, असं मृत्यूपत्रात नमूद केलं होतं. भाभांच्या घरातील मौल्यवान वस्तू, फर्निचर यांचीही मालकी एनसीपीएकडे सोपवण्यात आली. त्यानुसार एनसीपीएला बंगल्याचा ताबा मिळण्यासाठी नोव्हेंबर 2013पर्यंत वाट पाहावी लागली. या बंगल्याची अवस्था फारय दयनीय असल्यानं, गेल्या डिसेंबर महिन्यात एनसीपीएनं रंगरंगोटी करून हा बंगला चकाचक केला. त्यानंतर हा बंगला लिलावात काढण्याची घोषणा एनसीपीएनं केली.
मात्र या वास्तूत होमी भाभांचं स्मारक व्हावं, अशी मागणी पुढं आली. बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी ही मागणी उचलून धरली. बीएआरसीच्या दोघा कर्मचाऱ्यांनी तर लिलाव होऊ नये, यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली.
मात्र लिलाव थांबवण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनीही या बंगल्याचं स्मारक व्हावं, यासाठी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांना हस्तक्षेप करण्याची विनंतीही केली.
मात्र या सर्व प्रयत्नांवर अखेर पाणी पडलं. भाभांच्या मृत्यूनंतर 48 वर्षांनी मेहरांगीर बंगल्याची 372 कोटी रूपयांना लिलावात विक्री करण्यात आली. या निधीतून आता एनसीपीएचा खर्च भागवण्यात येणार आहे.
अलिकडच्या काळातील मुंबईतला सर्वात मोठा जागाविक्रीचा व्यवहार म्हणून याकडं पाहिलं जातंय. कधीकाळी डॉ. होमी भाभांचं घर असलेल्या या बंगल्याचं पुढं काय होणार, हे कळू शकलेलं नाही. मात्र लिलावाच्या रकमेतून कला आणि संस्कृती जपण्याचंच काम होणार आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.