कनेक्शन बॉलिवूड, बिझनेस आणि अंडरवर्ल्डचं!

प्रीती झिंटा आणि नेस वाडीया प्रकरण आता वेगळ्याचं वळणावर पोहोचलंय. या प्रकरणात आता अंडरवर्ल्डनं देखील उडी घेतलीये. कारण, नेस वाडीया याचे वडील नुस्ली वाडीया यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना रवी पुजारीनं धमकी दिल्याची तक्रार केलीये.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 18, 2014, 06:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
प्रीती झिंटा आणि नेस वाडीया प्रकरण आता वेगळ्याचं वळणावर पोहोचलंय. या प्रकरणात आता अंडरवर्ल्डनं देखील उडी घेतलीये. कारण, नेस वाडीया याचे वडील नुस्ली वाडीया यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना रवी पुजारीनं धमकी दिल्याची तक्रार केलीये. त्यामुळं नेस वाडीया आणि प्रिती झिंटा प्रकरण भविष्यात आणखी चिघळणार असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणी आता मुंबई पोलीसांचा खंडणी विभाग पुढील तपास करत आहेत.
बॉलिवूड, अंडरवर्ल्ड आणि उद्योगपतींमधलं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. प्रीती झिंटानं नेस वाडियाविरोधात केलेल्या तक्रारीच्या प्रकरणामध्ये ट्विस्ट आलाय. अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीनं धमकी दिल्याची तक्रार नेस वाडिया यांचे वडील नुस्ली वाडिया यांनी केलीय. प्रीती झिंटाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, अशा स्वरुपाची धमकी रवी पुजारीकडून आल्याचं वाडियांनी तक्रारीत म्हटलंय.
१६ तारखेला दिवसभरात एकूण पाच धमकीचे फोन आले. संध्याकाळी चारच्या सुमाराला नुस्ली वाडीया यांच्या एका सेक्रेटरीच्या मोबाईलवर फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीनं समोरुन शिव्या दिल्या. अगर प्रीती के मामले में कुछ किया तो, उसके परिणाम भुगतने पडेंगे, प्रीती से दूर रहो... नहीं तो बिझनेस में बडा नुकसान झेलना पडेगा आणि पुन्हा शिव्या.....
हा फोन आल्यानंतर बॉम्बे डाईंगच्या ऑफिसमध्ये एकच खळबळ उडाली, नुस्ली वाडीया यांच्या सेक्रेटरीनं लगेच नुस्ली वाडीयांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली.
पुन्हा रात्री आठच्या सुमाराला नुस्ली वाडीया यांच्या सेक्रेटरीच्या फोनवर एक एसएमएस आला.- " DONT MISCHIEF WITH PRITI OR ELSE U WILL FACE MAJOR LOSS IN BUSINESS "
- हा एसएमएस वाचून पुन्हा बॉम्बे डाईंग कंपनीत खळबळ उडाली

नेस वाडियानं आयपीएल मॅचच्या दरम्यान छेडछाड केल्याची तक्रार प्रीतीनं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये केलीय. याबाबत पुरावे तपासून कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही स्पष्ट केलंय. यासंदर्भात किंग्ज इलेव्हन पंजाबचे सीओओ, तसंच मॅचदरम्यान उपस्थितांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. सध्या प्रीती आणि नेस दोघेही भारताबाहेर असल्यानं त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. प्रीतीच्या तक्रारीचा तपास सुरू असतानाच आता रवी पुजारीकडून नुस्ली वाडियांना धमकी आल्याची तक्रार आलीय.
सुरुवातीला खंडणी मागणारं अंडरवर्ल्ड नंतर सिनेमांमध्ये पैसे गुंतवू लागलं. एवढंच नाही तर एखाद्याचा सिनेमा चालावा म्हणून अंडरवर्ल्डनं अनेकांवर थेट ट्रिगरही दाबली. अंधेरीत गुन्हेगारी जगाची सुरुवात करणाऱ्या रवी पुजारीनं आणि अबू सालेमनं बॉलिवूडकरांना खूप त्रास दिलाय.
मुंबईतल्या अंधेरीमधल्या चाळीमधून रवी पुजारीच्या गुन्हेगारी कारवायांना सुरुवात झाली. बिल्डर्सकडून खंडणी मागण्याचं काम रवी पुजारी टोळी करते. मुंबई आणि कर्नाटकमध्ये ही गँग सक्रिय आहे. देशभरात रवी पुजारी गँगचे जवळपास २०० गुंड आहेत. १९९० मध्ये चेंबूरमधल्या कुकरेजा बिल्डर हत्या प्रकरणात रवी पुजारीचा हात आहे. ९० च्या दशकात रवी पुजारी गँग छोटा राजन गँगमध्ये विलीन झाली. बँकॉकमध्ये छोटा राजनवर हल्ला झाल्यानंतर पुजारी गँग दाऊदची शत्रू झाली.
आतापर्यंत सलमान खान, फरहान अख़्तर, अक्षय कुमार, विवेक ओबेरॉय, बोनी कपूर, सोहेल खान, आणि करण जोहर या सारख्या दिग्गजांना रवी पुजारीनं धमक्या दिल्या आहेत. आता प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात ही नवी धमकी आलीय. आता या ट्विस्टसह पोलीस मूळ प्रकरणाचा तपास कसा करतायत, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.