अजित पवारांच्या ‘सूSSSSराज्या’ला हायकोर्टाचा दणका!

ज्या उजनी धरणाच्या पाण्यावरून हे ‘सु’नाट्य रंगलंय त्याचबद्दल उच्च न्यायालयानं नागरिकांच्या बाजूनं निर्णय देत सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे जमिनीवर आणलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 10, 2013, 02:17 PM IST

www.24taas.com, मुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंध महाराष्ट्राला आपल्या ‘सुSSSSसुSSSSराज्या’ची ओळख करून दिल्यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका होतेय. पण, ज्या उजनी धरणाच्या पाण्यावरून हे ‘सु’नाट्य रंगलंय त्याचबद्दल उच्च न्यायालयानं नागरिकांच्या बाजूनं निर्णय देत सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे जमिनीवर आणलंय.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सोलापूरमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावं, यासाठी उपोषणाला बसलेले सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी उजनीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या या उपोषणाची अजितदादांनी अर्वाच्य भाषेत खिल्ली उडवली. मात्र, प्रभाकर आपल्या उद्देशापासून डळमडळले नाहीत. आज त्यांच्या उपोषणाचा ६६ वा दिवस आहे. सत्ताधाऱ्यांकडून केवळ थिल्लरपणा मिळाला असला तरी आज त्यांना हायकोर्टानं मात्र दिलासा दिलाय.

आता सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणामध्ये खडकवासला धरणासह आसपासच्या इतर धरणांमधून येत्या चोवीस तासाच्या आत पाणी सोडले जाणार आहे. उजनी धरणाच्या वरच्या बाजूस २२ धरणे आहेत. या धरणांमध्ये पाणी असल्यामुळे उजनीमध्ये पाणी येत नाही. आसपासच्या धरणातील पाणी उजनी धरणामध्ये सोडावे आणि या पाण्याचे समान वाटप करावे, अशी नागरिकांची मागणी होती. उजनी धरणापासून खडकवासला धरण दीडशे किमी अंतरावर आहे. खडकवासला धरणातून सोडलेले पाणी सहा ते सात दिवसांनी उजनी धरणात पोहोचेल. हे पाणी भीमा नदीतून जाणार आहे. या काळात भीमा नदीतून पाणी खेचून घेतले जाण्याची शक्यता असल्याने लोडशेडिंग करावे, असे निर्देश खंडपीठाने दिलेत. आसपासच्या धरणातून किती पाणी सोडले आणि त्यापैकी किती पाणी उजनी धरणात पोहोचले, याची माहिती राज्य सरकारने द्यावी , असा आदेशही कोर्टाने दिला.