www. 24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबईची घडी विस्कटून टाकलीय. शहर आणि उपनगरात बरसणा-या पावसामुळं हिंदमाता, परेल, दादर टीटी, गांधीमार्केट, सायन रोड नंबर 24, महेश्वरी उद्यान भागात पाणी साचलंय.
पावसामुळं विस्कळीत झालेल्या तिन्ही मार्गावरच्या लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. बेस्टची वाहतूकही काही ठिकाणी वळवण्यात आलीय. ईस्टर्न-वेस्टर्न हायवेसह मुंबईतल्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅममुळं नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. वरळी सी लिंकवर पावसामुळं ट्रॅफिक जॅम झालीय. पश्चिम उपनगरातही काही ठिकाणी ट्रॅफिक जॅम दिसतेय.दिंडोशी पुलाआधी खड्ड्यांमुळं वाहतुकीची प्रचंड कोंडी झालीय.
परळ भागात पाणी साचलंय, तर एलफिन्स्टन रेल्वे स्थानकातही पाणी तुंबलंय. चर्चगेटला के. सी. कॉलेजजवळच्या एस. टी. पारेख मार्गावर झाड पडल्यानं ७ ते ८ गाड्यांचं नुकसान झालंय. आज सकाळी ८ वाजल्यापासून ११ वाजेपर्यंत मुंबई शहरात २२.९४ मिमी, पश्चिम उपनगरात १९.२० मिमी तर पूर्व उपनगरात १६.९५ मिमी पावसाची नोंद झालीय.
पावसामुळं मुंबई आणि ठाणे परिसरातल्या मनपाच्या तसेच अनेक खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आलीय. महापालिकेनं मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिलाय. गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय.
फोटोफीचर पावसाने उडविली दैना
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.