www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत मुंबई सेंट्रल इथं एनआयए आणि आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात कोट्यावधीचं घबाड हाती लागल्यानंतर हवालामार्फत केले जाणारे व्यवहार पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलेत. हवालामार्फत कसे व्यवहार केले जातात? मुंबईत कुठे असे व्यवहार चालतात आणि अंडरवर्ल्डमध्ये या हवाला ऑपरेटर्सना किती महत्त्व आहे? हे आपण पाहणार आहोत.
कसा होतो हा व्यवहार
एक दोन नाही तर तब्बल १५० च्या जवळपास बॅगांमधून अंगडीयांमार्फत हवालाने पाठवले जाणारे २०० कोटी रुपये एनआयए आणि आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात मिळालेत. या छाप्यामुळे अंगडियांचा हवाला व्यवहार पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून हे व्यवहार छुप्या पद्धतीनं सुरुच आहेत. व्यापाऱ्यांचाही त्यांच्यावर चांगलाच विश्वास बसलाय.
हवाला म्हणजे का़य? कसे पोहोचवले जातात कोट्यावधी रुपये हवालामार्फत? हवाला ऑपरेटर्स जाळं देशात कसं पसरलंय? असे अनेक प्रश्न ही प्रकरणं समोर आल्यानंतर सामान्य नागरिकांना पडतात. अंगडिया म्हणजे एका अर्थी कुरीअर सर्विस पण, या कुरिअर सर्विसमध्ये अंगडिया लाखो करो़डो रुपये कमावतात. हंगामात या अंगडियांना खूप मागणी असते. याकाळात एक लाख रुपये पोहोचवण्याच्या बदल्यात, २०० रुपये ते ८०० हे अंगडिया घेतात. दिवसा अंगडियांमार्फत फक्त महाराष्ट्रातून १०० कोटींच्या जवळपास व्यवहार होतात तर एक लाख कोटी हिरे व्यापारी आणि ७० हजार कोटी सोने आणि चांदी व्यापारी या अंगडियांमार्फत व्यवहार करतात. मुंबईतील गिरगाव, मालाड आणि अंधेरीसह डझनभर ठिकाणी या अंगडियांचे व्यवहार चालतात.
नुकतच आयपीएल बेटींग प्रकरणात मुंबई क्राईम ब्रान्चनं अल्पेश पटेल या अंगडियाला अटक केली होती. बुकी रमेश व्यास अल्पेश पटेल याच्यामार्फत हवालाने बेटींगचे पैसे देशात आणि परदेशात पोहोचवत होता. एवढचं नाही तर अनेक दहशतवादी संघटना या अंगडियांचा वापर करुन दहशतवादासाठी पैसे मिळवतात, हे देखील पोलीस तपासात उघड झालंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.