मुंबई : 'मेट्रो 3' प्रकल्पाच्या विरोधात गिरगावकरांच्या आंदोलनाला राजकीय पाठबळ लाभलंय. या मुद्यावरून शिवसेनेनं 'गिरगाव बंद'ची हाक दिलीय. तर मनसेनंही चिमटा काढत का होईना, गिरगावकरांसाठी 'बंद'ला पाठिंबा दिलाय.
मेट्रो 3 प्रकल्पाच्या विरोधात गिरगावकरांनी सुरू केलेल्या लढ्याला आता चांगलीच धार आलीय. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या भोंगळ आणि ढिसाळ नियोजनाच्या विरोधात गिरगावकर दंड थोपटून उभे ठाकलेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन धोरणावर चर्चा करण्यासाठी एमएमआरसीनं गिरगाव रहिवासी बचाव कृती समितीसह शिवसेना आणि मनसेच्या पदाधिका-यांनाही सोमवारी बैठकीला बोलावलं होतं. मात्र शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमधील शाब्दिक चकमकीमुळं यावेळी चांगलाच गोंधळ झाला. कुठल्याही तोडग्याविना ही बैठक संपली. या मुद्यावरून शिवसेनेनं 18 मार्चला गिरगाव बंदचा इशारा दिलाय.
दरम्यान, सत्तेत राहून बंद पुकारणाऱ्या शिवसेनेला राज ठाकरेंनी मार्मिक टोला लगावलाय. त्याच वेळी गिरगावकरांसाठी बंदला पाठिंबा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
शिवसेना-मनसेच्या पाठिंब्यामुळं गिरगावकरांना आणखी बळ मिळालंय. मेट्रो-3 बाधितांचं पुनर्वसन गिरगावमध्येच झालं पाहिजे. त्याशिवाय मेट्रो होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा गिरगावकरांनी घेतलाय.
मेट्रो 3 प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेपाठोपाठ मनसेनंही उडी घेतल्यानं वातावरण चांगलंच तापलंय. आता त्यात गिरगावकरांचं हित किती? आणि राजकारण किती? हे लवकरच कळेल.
दरम्यान, मेट्रो 3 प्रकल्पबाधित होणाऱ्या 300 चौरस फूटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जागा असलेल्या नागरिकांना दुप्पट क्षेत्रफळाच्या जागा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सुमारे 80 टक्के मेट्रो प्रकल्पग्रस्तांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच गिरगावातील मराठी कुटुंबांचं आहे त्याच जागी पुनर्वसन केलं जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.