मुंबई: रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळं सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना, मुंबई पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. टिळक नगर भागातल्या एम. जी. रोड परिसरातल्या एका दुकानात, सहा युवकांनी मिळून अल्पवयीन मुलीला दारु पाजून बलात्कार केला.
मंगळवारी रात्रीची ही घटना आहे. नेमक्या त्याचवेळी एक रिक्षाचालक तिथून जात होता. घटनास्थळी काही तरुणांची संशयास्पद हालचाल त्याला खटकली. म्हणून रिक्षाचालकानं गस्तीवरच्या पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन, सहा आरोपींना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणातली सतरा वर्षांची अल्पवयीन मुलगी सहा आरोपींमधल्या दोन जणांना ओळखत होती. पार्टी करायची आहे असे सांगून दोघांनीच तिला फूस लावून तिच्यावर मित्रांच्या मदतीनं सामूहिक बलात्कार केला.
पोलिसांनी पवन पगारे (२१), सिद्धार्थ शिलवन (२१), किरण निकाळजे (२३), विकास घेवाळ (२१), रवी पुमाले (२५) आणि सचिन सुकाळे (२३) या सहा आरोपींना ताब्यात घेतले. या वेळी पीडित मुलीसह सर्व जण नशेत धुंद होते. त्यानुसार आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या पीडित मुलीला पोलिसांनी उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या सहाही आरोपींवर पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.