मुंबई : फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि तो तिच्या एकतर्फी प्रेमात पडला. ती त्याच्याच परिसरात राहणारी असल्याचे लक्षात येताच त्यांने तिला प्रत्येक ठिकाणी गाठण्याचा प्रयत्न केला. ती भेटत नसल्याचे पाहून त्याने थेट कॉलेज गाठले. या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय कॉलेज तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली.
धारावीतील १७ वर्षीय मुथ्थुसेल्वी या कॉलेज तरुणीची ओळख फेसबुकवरून इलायराजा वेलपांडी (२१) याच्याशी झाली. फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि वेलपांडी तिच्या एकतर्फी प्रेमात पडला होता, अशी माहिती आता पोलीस तपासात पुढे येत आहे.
मूळचा तामिळनाडू येथील रहिवासी असलेला वेलपांडी धारावी परिसरात राहतो. सात महिन्यांपूर्वी त्याची फेसबुकच्या माध्यमातून मुथ्थुसेल्वीसोबत ओळख झाली. मुथ्थुसेल्वी आपल्याच परिसरात राहत असल्याचे समजताच, वेलपांडी तिच्या येण्या-जाण्याच्या मार्गात थांबायचा. तिच्या एकतर्फी प्रेमात पडलेल्या वेलपांडीने तिच्या कॉलेजपर्यंत मोर्चा वळविला होता. तो आपली छेडछाड करतोय, हे तिच्या लक्षात येताच ती बैचेन झाली आणि त्यातून तिने आत्महत्या केल्याचे पुढे आलेय.
काही दिवसांपूर्वीच वेलपांडीने मुथ्थुसेल्वीला प्रपोज केले. तिने त्याला नकार देत, इथून पुढे वाटेत येऊ नये, असे बजावले होते. मात्र, तरीही तो तिच्या मागावर होता. त्याच्या रोजच्या छेडछाडीला कंटाळून अखेर ९ डिसेंबर रोजी तिने विष घेतले. सायन रुग्णालयात दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी तिचा मृत्यू झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.