मुंबई: मुंबईसह देशभरात सध्या परदेशी विद्यापीठांकडून अनेक प्रकारच्या पदव्या एक ते दोन वर्षांत देण्याचं आमिष दाखविलं जात आहे. या जाहिरातबाजीला अनेक विद्यार्थी बळी पडत आहेत. मात्र या विद्यापीठांच्या पदव्या मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणासाठी अमान्य असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना पदवी घेऊनही पुढील शिक्षण घेता येत नाही.
एका परदेशी युनिव्हर्सिटीमध्ये बारावी झालेल्या विद्यार्थिनीनं हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तिला एमबीए करायचं असल्यानं तिनं यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून पदवी घेतली. तिनं पदविका शिक्षण पूर्ण झालं असल्यामुळं तिला मुक्त विद्यापीठाच्या नियमांनुसार पदवीच्या शेवटच्या वर्षात प्रवेश मिळाला. या पदवीच्या आधारे तिनं मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेत पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला. यासाठी तिनं हातची नोकरी सोडून प्रवेश घेतला, मात्र सहा महिन्यांचं शिक्षण घेतल्यानंतर तिची पदवी ग्राह्य नसल्याचं विद्यापीठानं सांगितल्यानं तिला नोकरी आणि शिक्षणही गमावण्याची वेळ आली होती. मात्र तिचं नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाच्या तक्रार निवारण विभागाकडून प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं जातंय.
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी तीन वर्षांची पदवी घेणं अनिवार्य आहे. मात्र अनेक परदेशी विद्यापीठं दीड-दोन वर्षातच पदवी देत असल्यामुळं ही पदवी विद्यापीठ नियमानुसार पदव्युत्तरसाठी ग्राह्य धरली जात नाही.
जाणून घ्या या विद्यापीठांची पदवी विद्यापीठाला अमान्य
- अन्नामलाई युनिव्हर्सिटी,
- मदुराई कामराज युनिव्हर्सिटी,
- मनोनामनीयम सुंदरनार युनिव्हर्सिटी,
- मदारार युनिव्हर्सिटी,
- ओमॅनिया युनिव्हर्सिटी,
- महात्मा गांधी युनिव्हर्सिटी,
- काकटिरा युनिव्हर्सिटी या विद्यापीठांची पदवी विद्यापीठाच्या कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ग्राह्य धरण्यात येत नाही.
विशेष म्हणजे ही विद्यापीठं विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.